नाशिक, (प्रतिनिधी) ४ मार्च - शहरात वाहनचोरीची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, चोरट्यांनी आता थेट महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहनांनाही लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील गरवारे पॉईंटवरून एक १२ टायर हायवा ट्रक आणि शहरातील अन्य भागांतून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी अंबड, भद्रकाली आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महामार्गावरून 'बेन्झ हायवा'ची चोरी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवासी गोपाळ संजय पाटील हे २० फेब्रुवारी रोजी आपल्या बेन्झ हायवा (MH 51 C 2710) या बारा टायर मालट्रकासह नाशिकमध्ये आले होते. त्यांनी आपला ट्रक महामार्गावरील गरवारे पॉईंट परिसरात पार्क केला असता, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून हा अवजड ट्रक पळवून नेला. या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार साळवे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
शालिमार परिसरातून अॅक्टीव्हा गायब
दुसरी घटना शहराच्या मध्यवर्ती असलेल्या शालिमार भागात घडली. दिपालीनगर येथील शशांक प्रमोद सदाराव हे १९ फेब्रुवारी रोजी कामानिमित्त शालिमार येथे आले होते. त्यांनी आपली अॅक्टीव्हा (MH 04 GY 7390) राज बहाद्दुर हॉस्पिटल परिसरात उभी केली होती. काही वेळातच चोरट्यांनी ही दुचाकी लंपास केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून हवालदार शेळके तपास करत आहेत.
अपार्टमेंटच्या पार्किंगमधून दुचाकी चोरी
तिसरी घटना पाथर्डी फाटा परिसरात घडली. कामटवाडा येथील भगवान हरिभाऊ गलांडे यांची प्लेझर (MH 15 JJ 1439) ही दुचाकी रविवारी (दि. १) रात्री गामणे ग्राऊंड जवळील गजविनायक अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली होती. सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पार्किंगमधूनही चोरट्यांनी ही गाडी पळवून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार पगारे अधिक तपास करत आहेत.
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर:
शहरात सार्वजनिक ठिकाणांसह सोसायट्यांच्या पार्किंगमधूनही वाहने चोरीला जात असल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
नाशिक : बसस्थानकातील प्रतिक्षालयात थांबलेल्या प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरट्यांनी लांबविले. ही घटना महामार्ग बसस्थानकात घडली असून यात अडिच तोळे वजनाचे व सुमारे ९० हजार रूपये किमतीच्या मंगळसुत्रावर भामट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविता विनोद बोडके (रा.मानकर पेट्रोल पंपा शेजारी मखमलाबाद) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. बोडके गेल्या १० फेब्रुवारी रोजी आपल्या वडिलांसमवेत मुंबईला गेल्या होत्या. रात्रीच्या प्रवासासाठी बापलेक महामार्ग बसस्थानकात थांबले होते. रात्री दहा साडे दहा वाजेच्या सुमारास वडिल बसच्या चौकशीसाठी नियंत्रण कक्षात गेले असता प्रतिक्षालयात भांबलेल्या बोडके यांच्या गळ््यातील अडिच तोळे वजनाचे दुपदरी मंगळसुत्रावर चोरट्यांनी डल्ला मारला. झोपी गेल्याची संधी साधत भामट्यांनी मंगळसुत्र हातोहात लांबविले. अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.