नाशिकमध्ये आत्महत्येचे सत्र सुरूच... महिलेसह दोघांनी जीवनयात्रा संपवली...

Share:
Main Image
Last updated: 04-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ४ मार्च - शहरात आत्महत्येच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, सोमवारी (दि. २) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या दोघांनी आपली जीवनयात्रा संपवली. यामध्ये एका ३५ वर्षीय विवाहितेचा आणि ५० वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. या दोन्ही घटनांच्या कारणांचा उलगडा अद्याप झालेला नसून, भद्रकाली आणि इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

उपचारादरम्यान मृत्यू
पहिली घटना टाकळी फाटा परिसरातील शिवनेरी नगर भागात घडली. येथील रहिवासी शिवकुमार रामचंद्र धुर्वे (५०) यांनी गेल्या रविवारी (दि. २२) अज्ञात कारणातून राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले होते. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, आठवडाभरापासून सुरू असलेली त्यांची मृत्यूशी झुंज सोमवारी अपयशी ठरली. जिल्हा रुग्णालयातील डॉ. रोहिदास खंडारे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक आरिफ सय्यद पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
दुसरी घटना पाथर्डी फाटा परिसरातील ज्ञानेश्वरनगर येथे समोर आली. येथील शारदा ईश्वर आडोळीकर (३५) या विवाहितेने सोमवारी राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याच्या हुकास दोरीने गळफास लावून घेतला. ही बाब पती ईश्वर आडोळीकर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने त्यांना खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, डॉ. नितीन बोरा यांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. इंदिरानगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली असून, हवालदार तळपाडे अधिक तपास करत आहेत.

दरम्यान, मानसिक नैराश्य किंवा समस्या असल्यास मदतीसाठी अनेक हेल्पलाइन उपलब्ध आहेत. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet.