नाशिक, (प्रतिनिधी) ३ मार्च - शहरातील पंचवटी परिसरातील हिरावाडी भागात रविवारी रात्री दुचाकीस्वार टोळक्याने हातात कोयते आणि दांडके नाचवत मोठी दहशत माजवली. या टोळक्याने केवळ वाहनांची तोडफोडच केली नाही, तर एका नागरिकावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या खळबळजनक घटनेप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोयते नाचवत गल्लीत शिरले टोळके
मिळालेल्या माहितीनुसार, संशयित प्रेम आहिरे आणि त्याच्या साथीदारांनी रविवारी (दि. १) रात्री शिवकृपानगर, हिरावाडी येथील रो-हाऊस परिसरात दोन दुचाकींवर येऊन धुमाकूळ घातला. हातात नंग्या तलवारी आणि कोयते असल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या टोळक्याने प्रविण महाजन यांच्या कारची तोडफोड केली. तसेच फिर्यादी अशोक प्रभाकर थोरात यांची बुलेट आणि शेजारी राहणारे सुमित बैरागी यांच्या मोटारसायकलवर कोयत्याने वार करून वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले.
प्रसंगावधान राखल्याने थोरात बचावले
वाहनांची तोडफोड सुरू असताना संशयित प्रेम आहिरे याने फिर्यादी अशोक थोरात यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, थोरात यांनी तत्काळ प्रसंगावधान राखत वार चुकवल्याने ते बालंबाल बचावले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी अशोक थोरात यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नेमाणे करीत आहेत.
नाशिक : मदतीच्या बहाण्याने भामट्याने एटीएम कार्डची आदला बदल करीत महिलेच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत सुमारे ७० हजार ६०० रूपये परस्पर काढून घेण्यात आले असून असून याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुदेशराणी कुलदिप सिंग (मुळ रा.हरियाणा हल्ली जुनी डीसी लाईन क्वार्टर सप्लाय डेपो देवळाली कॅम्प) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुदेशराणी सिंग या रविवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास झेंडा चौकातील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या एटीएम बुथमध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांना पाठीमागे उभ्या असलेल्या तरूणाने पैसे काढण्यासाठी मदत केली. भामट्याने सिंग यांच्या एटीएम कार्डची आदला बदल करीत परस्पर वेगवेगळ््या एटीएम बुथ आणि पेट्रोल पंपावरून तब्बल ७० हजार ६०० रूपये काढून घेतले असून याबाबत मोबाईलवर संदेश प्राप्त झाल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. उपनिरीक्षक देवरे तपास करीत आहेत.