नाशिक, (प्रतिनिधी) ३ मार्च - येत्या काळात होणाऱ्या राज्यसभेच्या सात जागांच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीमधील जागावाटपात शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आगामी कुंभमेळा आणि नाशिकमधील पक्षाची ताकद टिकवून ठेवण्यासाठी गोडसे यांच्या अनुभवाचा फायदा घेण्याची रणनीती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आखत असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेतील पराभवानंतर पुनर्वसनाची संधी?
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघात ठाकरे विरुद्ध शिंदे अशी अटीतटीची लढत झाली होती. यामध्ये ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे यांनी गोडसे यांचा १ लाख ६० हजार मतांनी पराभव केला होता. सलग दोनदा खासदार म्हणून निवडून आलेल्या गोडसे यांची विजयाची हॅट्ट्रिक हुकली होती. महायुतीकडून उमेदवारी जाहीर होण्यास झालेला प्रचंड विलंब आणि अंतर्गत ओढाताण यामुळे त्यांना फटका बसल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत होते. मात्र, आता राज्यसभेच्या माध्यमातून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे संकेत मिळत आहेत.
नाशिकमध्ये 'समन्वय' राखण्यासाठी अनुभवी चेहरा
आगामी काळात नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या मोठ्या इव्हेंटच्या पार्श्वभूमीवर शहरात शिवसेनेचे (शिंदे गट) अस्तित्व प्रभावी असणे गरजेचे आहे. सध्या नाशिक महापालिकेत भाजपचे वर्चस्व आहे, तर त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेत शिंदे गटाची सत्ता आहे. या दोन्ही सत्ताकेंद्रांमध्ये समन्वय राखण्यासाठी आणि केंद्र सरकारकडून निधी खेचून आणण्यासाठी संसदेचा अनुभव असलेल्या हेमंत गोडसे यांना दिल्लीत पाठवण्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे एकमत होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गोडसे यांच्या नावाची चर्चा का?
अनुभवी चेहरा: दोन टर्म खासदार म्हणून संसदेत केलेल्या कामाचा दांडगा अनुभव.
कुंभमेळ्याची तयारी: सिंहस्थासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दुवा म्हणून काम करण्याची क्षमता.
पक्ष मजबुती: लोकसभा पराभवानंतर खचलेल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी स्थानिक नेत्याला संधी.
समन्वय: महायुतीतील घटक पक्ष (भाजप व राष्ट्रवादी) यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध.
राजकीय वर्तुळात चर्चा: हेमंत गोडसे यांनी लोकसभा निवडणुकीत पराभव होऊनही जनसंपर्क कायम ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख असल्याने, नाशिकला झुकते माप देत त्यांना राज्यसभेवर पाठवले जाण्याची शक्यता अधिक आहे.