साठेखत करूनही ४८ लाखांना गंडा... अंबड पोलिसांत गुन्हा दाखल...

Share:
Last updated: 03-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ३ मार्च - शहरातील घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात एका व्यक्तीची तब्बल ४८ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैसे घेऊनही मूळ मालकाने खरेदीखत करून देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला असून, अंबड पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रघुनाथ महाजन (रा. गोल्डन पॅलेस, राजीवनगर) यांनी दत्ताराम संपतराव राजोळे (रा. कोमल रो-बंगलो, कामटवाडे) यांच्या मालकीच्या घराचा व्यवहार सन २०२४ मध्ये ५० लाख रुपयांत ठरवला होता. या व्यवहारापोटी महाजन यांनी वेळोवेळी रोख आणि आरटीजीएस (RTGS) द्वारे एकूण ४८ लाख ६० हजार रुपये राजोळे यांना अदा केले होते.

Advertisement

खरेदी खतासाठी टाळाटाळ
पैसे मिळाल्यानंतर १८ डिसेंबर २०२५ रोजी त्र्यंबकनाका येथील दुय्यम निबंधक कार्यालयात या घराचे रीतसर साठेखत (Agreement to Sale) करण्यात आले. नियमानुसार साठेखतानंतर खरेदीखत होणे अपेक्षित होते. मात्र, रक्कम पदरात पडल्यानंतर संशयित राजोळे यांनी आपला इरादा बदलला. "सातबारा उताऱ्यावर नाव लागले की मगच खरेदीखत करून देऊ," अशी वेगवेगळी कारणे सांगून त्यांनी वर्षभर टाळाटाळ केली.
आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच गणेश महाजन यांनी अंबड पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, मालमत्ता खरेदी करताना केवळ साठेखतावर विसंबून न राहता, कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी आणि व्यवहारातील सर्व कागदपत्रांची पडताळणी तज्ज्ञांकडून करून घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

नाशिक : बिल्डींग समोर मोबाईलवर बोलणाऱ्या एकाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला. या घटनेत सुमारे ७० हजार रूपये किमतीच्या मोबाईलवर भामट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदिप प्रकाश जाधव (रा.श्री वक्रतुंड इलाईट बिल्डींग एम.पी.देवरे मार्ग रामेश्वरनगर गंगापूररोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. जाधव रविवारी (दि.१) रात्री परिसरातील श्री तिरूमला सोसायटी समोरील मोकळ्या जागेत आपल्या मोबाईलवर बोलत असतांना हा प्रकार घडला. पाठीमागून आलेल्या एकाने जाधव यांच्या हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून पोबारा केला. याच वेळी आलेल्या दुचाकीवर डबलसिट बसून भामट्यानी कॅनलरोडच्या दिशेने पलायन केले असून अधिक तपास उपनिरीक्षक श्रीराम पाटील करीत आहेत.

Comments

No comments yet.