नाशिक, (प्रतिनिधी) २ मार्च - नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोवंश जनावरांची कत्तलीसाठी निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या एका पिकअपवर पोलिसांनी धाड टाकली आहे. या कारवाईत पाच गायी आणि तीन वासरांची सुटका करण्यात आली असून, पोलिसांनी पिकअप चालकाला अटक केली आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शेनितगाव-लहवित भागातून एका पिकअपमध्ये (क्रमांक MH 14 AH 9755) गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याची गोपनीय माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रविवारी (दि. १) सायंकाळी विहीतगाव चौफुली आणि अत्री नंदन सोसायटी परिसरात सापळा रचला. संशयास्पद पिकअप अडवून पाहणी केली असता, त्यात आठ गोवंश जनावरे अत्यंत निर्दयीपणे कोंबलेली आढळून आली.
कोणावर झाली कारवाई?
अटक आरोपी: कलीम सलीम शेख (वय ३२, रा. कथडा, जुने नाशिक) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
फरार/संशयित: जमिल रशिद कुरेशी (रा. नाईकवाडीपुरा) याच्या सांगण्यावरून ही जनावरे सुनील नामक व्यक्तीकडून ताब्यात घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
जप्त मुद्देमाल: पोलिसांनी ६ लाख २० हजार रुपये किमतीची पिकअप जप्त केली असून सर्व जनावरांची सुटका केली आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस अंमलदार पोपट ठोंबरे यांनी फिर्याद दिली असून, उपनगर पोलीस ठाण्यात 'प्राण्यांना निर्दयीपणे वागविण्यास प्रतिबंध' आणि 'महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्या'न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस जमादार संतोष जाधव करत आहेत.
नाशिक : बेडरूमची खिडकी उघडून चोरट्यांनी टेबलावर ठेवलेले टॅब व मोबाईल असा सुमारे ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला. ही घटना जयभवानीरोड भागात घडली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदिनारायण उमेश पाटील (रा.अंजनीनंदन सोसा.जयभवानीरोड) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पाटील शनिवारी (दि.२८) रात्री आपल्या बेडरूममध्ये झोपी गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी बेडरूमची बाहेरून खिडकी उघडून ही चोरी केली. खिडकीत हात घालून भामट्यांनी टेबलावर ठेवलेले दोन टॅब व दोन मोबाईल असा सुमारे ३४ हजाराचा ऐवज चोरून नेला. हवालदार बरेलीकर तपास करीत आहेत.