नाशिक, (प्रतिनिधी) १ मार्च - नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य केवळ पर्यटन स्थळ नाही, तर ते भावी पिढ्यांसाठी नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे आगामी दहा वर्षांत जैवविविधतेच्या राखणाबरोबरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा समतोल साधणे हेच पुढील दशकाचे ध्येय असले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या स्थापनेला ४० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी प्रसाद बोलत होते. यावेळी खासदार भास्कर भगरे, आमदार दिलीप बनकर, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, विभागीय व्यवस्थापक उमेश वावरे, विभागीय वन अधिकारी गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक हेंमत उबाळे, वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी आदींसह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, पक्षी अभयारण्य परिसरात ध्वनी मर्यादा (Sound Restrictions) काटेकोरपणे लागू केल्या जातील. मोठ्या आवाजातील संगीत, वाहनांचे अनावश्यक हॉर्न व इतर ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवून शांत पर्यावरण सुनिश्चित करण्यात येईल. पक्षी अभयारण्य परिसरात अनधिकृत उत्खननांवर कठोर निर्बंध घालण्यात येणार असून जलाशय आणि किनारी परिसंस्थेच्या रक्षणासाठी सतत निरीक्षण यंत्रणा कार्यरत ठेवली जाईल.
पर्यटकांसाठी वैज्ञानिक पद्धतीने नियोजित विशेष दर्शन-बिंदू (Viewing Points) उभारले जाईल. यामुळे पक्ष्यांचे निरीक्षण सुलभ होईल. मात्र, पक्ष्यांच्या अधिवासाला कोणताही त्रास होणार नाही. पक्षी अभयारण्यात आधुनिक इंटरप्रिटेशन सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. थ्री डी प्रिंटिंग तंत्रज्ञानाद्वारे पक्ष्यांच्या अचूक प्रतिकृती, स्थलांतर मार्गांचे मॉडेल्स आणि परिसंस्थेची माहिती प्रदर्शित केली जाईल. विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी हे केंद्र ज्ञानाचे महत्त्वपूर्ण साधन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नियोजित पद्धतीने स्मरणिका विक्री केंद्र (Souvenir Shops) सुरू करण्यात येईल. स्थानिक हस्तकला आणि पर्यावरणपूरक उत्पादने यांना प्राधान्य दिले जाईल. जलाशयातील माशांची व खाद्यसाखळीची घनता वाढविण्याचे (Fish and Feed Densification) उपक्रम राबविण्यात येईल. यामुळे स्थलांतरित पक्ष्यांना नैसर्गिक अन्नस्रोत उपलब्ध राहतील. पक्ष्यांच्या सुरक्षित प्रजननासाठी नेस्टिंग आयलंड्स तयार करणे, आवश्यकतेनुसार झाडांचे पुनर्स्थापन (Transplantation) करून अधिवास समृद्ध करण्याचे त्यांनी सांगितले. पक्षीप्रेमी आणि तज्ज्ञांना एकत्र आणण्यासाठी ‘सोसायटी ऑफ बर्ड कंझर्वेशनिस्ट’ स्थापन करण्यात येईल. या संस्थेमार्फत स्वयंसेवक, संशोधक आणि प्रशासन यांचा समन्वय साधला जाईल. अभयारण्याची ओळख अधिक व्यापक करण्यासाठी सर्व प्रमुख राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवर माहितीफलक व दिशादर्शक फलक उभारण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. “नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्यासाठी विकास आणि संवर्धन यांचा संतुलित मार्ग स्वीकारल्यास या अभयारण्याचे महत्त्व पुढील ४० वर्षांत अधिक वृद्धिंगत होईल,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी नांदूर मध्यमेश्वर @४० या स्मरणिकेचे व माहितीपटाचे प्रकाशन करण्यात आले तसेच पर्यटकांकरिता वार्षिक पास, पी टी झेड कॅमेरा रूम, चाळीस हजार विद्यार्थ्यांकरिता मोफत प्रवेश अशा विविध योजनांचे उद्घाटन देखील करण्यात आले. खासदार भगरे यांनी नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचा विकास करून जागतिक स्तराराचे निसर्गपर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या सूचना केल्या. आमदार बनकर यांनी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याच्या विकासाकरिता नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे सांगितले. यावेळी उपवनसंरक्षक भवर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याच्या ४० व्या वर्धापन दिनानिमित्त चापडगाव निसर्ग पर्यटन संकुल येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण तसेच दत्ता काका उगावकर, जेष्ठ पक्षी अभ्यासक आणि भरत शिंदे, विभागीय वन अधिकारी यांनी नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी चापडगाव, मांजरगाव, दिंडोरितास, खानगावथडी, शिंगवे, कोठुरे, काथरगाव, करंजगाव, भुसे, नांदूरमध्यमेश्वर, कुरडगांव येथील सरपंच, ग्रामस्थ, वनरक्षक कैलास सदगीर, गोरख पाटील, विद्यार्थी, पक्षी निरीक्षक व पक्षी अभ्यासक, पर्यटक, गाईड , संरक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी तर आभार वनपरिक्षेत्र अधिकारी हिरालाल चौधरी यांनी व्यक्त केले.
कृत्रिम प्रकाशामुळे रात्रीच्या वेळेस स्थलांतरित व स्थानिक पक्ष्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर परिणाम होतो. त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात पक्ष्यांना सुरक्षित अधिवास उपलब्ध करून देण्यासाठी लाईट-फ्री डार्क झोन संकल्पना राबविण्यात येईल.
आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक