दुचाकींच्या समोरासमोर धडकेत तरुण ठार... तीन मित्र अजूनही रुग्णालयात...

Share:
Main Image
Last updated: 01-Mar-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १ मार्च - गंगापूर रोडवरील हरीओम ढाबा परिसरात दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण समोरासमोर धडकेत गंभीर जखमी झालेल्या २२ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रामचंद्र गोविंदा राऊत (रा. माणी, ता. सुरगाणा) असे मृत तरुणाचे नाव असून, गेल्या सहा दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. या अपघातात अन्य तीन तरुण-तरुणी अद्यापही जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नेमकी घटना काय?
सोमवारी (दि. २३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील रतनलाल मिठाई दुकानासमोर हा भीषण अपघात घडला होता. दोन दुचाकींची समोरासमोर इतकी जोरात धडक झाली की, दोन्ही वाहनांवरील स्वार हवेत उडून रस्त्यावर आदळले. यात रामचंद्र राऊत याच्यासह आणखी दोन तरुण आणि एका तरुणीला गंभीर दुखापत झाली होती.

Advertisement

सहा दिवसांपासून सुरू होते उपचार
अपघातानंतर तातडीने चौघांनाही जवळच्या श्री गुरुजी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. रामचंद्र राऊत याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. शनिवारी (दि. २८) रात्री उशिरा उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. डॉ. सुयोग ठाकूर यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

पोलीस तपास सुरू
या दुर्दैवी घटनेची नोंद गंगापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अपघातातील अन्य जखमींची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार पगार करत आहेत. ऐन तारुण्यात सुरगाण्यातील या तरुणाचा मृत्यू झाल्याने माणी परिसरात शोककळा पसरली आहे.

नाशिक : नारळाच्या झाडावरून पडल्याने ३८ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना परबनगर भागात घडली. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
विकास हरिश्चंद्र ठाकरे (रा.गोपाळवाडी वडाळागाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ठाकरे शनिवारी (दि.२८) दुपारच्या सुमारास अशोका हॉस्पिटल परिसरातील शिवधारा हाईटस या इमारती समोर असलेल्या नारळाच्या झाडावर शहाळे तोडण्यासाठी चढला असता ही घटना घडली. उंचावरून पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. नाका तोंडातून रक्तस्त्राव होऊन तो बेशुध्द झाल्याने संदिप खाडे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. महेश खैरकर यांनी उपचारापूर्वी तपासून मृत घोषीत केले. हवालदार डोळस तपास करीत आहेत.

Comments

No comments yet.