अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी सीआयडीच्या हाती महत्त्वाचे पुरावे... 'त्या' अँगलने तपास सुरू...

Share:
Main Image
Last updated: 27-Feb-2026

पुणे, (प्रतिनिधी) २७ फेब्रुवारी - राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाला आता वेग आला असून, सीआयडीच्या (CID) हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले आहेत. या तपासात कोणत्याही प्रकारचे गुन्हेगारी कृत्य आढळल्यास तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी महत्त्वाची माहिती सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बारामती पोलीस ठाण्यात याप्रकरणी 'आकस्मिक मृत्यू'ची नोंद करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सीआयडीमार्फत अत्यंत गोपनीय आणि व्यावसायिक पद्धतीने केला जात आहे. त्याबद्दल माहिती देताना रामानंद यांनी तपासाची दिशा स्पष्ट केली.

तपासाचे मुख्य तीन पैलू
सीआयडी सध्या प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून तपास करत आहे:
घातपाताची शक्यता: या आकस्मिक मृत्यूमागे कोणताही घातपात झाला आहे का?
निष्काळजीपणा: विमान चालवताना किंवा देखभालीमध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा निष्काळजीपणा झाला होता का?
कट-कारस्थान: हा अपघात म्हणजे एखादा पूर्वनियोजित गुन्हेगारी स्वरूपाचा कट तर नाही ना?

फॉरेन्सिक आणि तज्ज्ञांची मदत
"आतापर्यंतच्या तपासात काही महत्त्वाचे पुरावे आमच्या हाती लागले आहेत," असे सांगून सुनील रामानंद पुढे म्हणाले की, "विमान अपघाताचा तांत्रिक तपास हा एक वेगळा भाग आहे, मात्र सीआयडीचा मूळ तपास हा 'आकस्मिक मृत्यू'च्या कारणांचा शोध घेण्यावर आहे. आम्ही हा तपास अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने करत आहोत. यासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंट, फॉरेन्सिक सायन्स लॅब (FSL) आणि एव्हिएशन एजन्सीजची तांत्रिक मदत घेतली जात आहे."

या प्रकरणातील पुराव्यांचे विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर, जर कोणाचाही सहभाग किंवा दोष आढळला, तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे संकेत सीआयडीने दिले आहेत. या माहितीमुळे राजकीय वर्तुळात आणि प्रशासकीय पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.