नाशकात कॉलेज परिसरही असुरक्षित...  तरुण विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला...

Share:
Last updated: 26-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ फेब्रुवारी - शहरातील वडाळा-पाथर्डी मार्गावरील गुरुगोविंदसिंग महाविद्यालय परिसरात एका महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून, त्याच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची सोन्याची साखळी लुटणाऱ्या टोळीचा इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असून, त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.

'तू जास्त माजला आहेस का?' म्हणत हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, मानस घनश्याम बोडके (२१, रा. दत्तनगर, पेठरोड) हा तरुण बुधवारी (दि. २५) दुपारी गुरुगोविंदसिंग महाविद्यालयासमोर उभा होता. यावेळी संशयितांनी त्याला गाठले आणि 'तू जास्त माजला आहेस का?' असे म्हणत विनाकारण वाद उकरून काढला. संशयितांनी मानसला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

धारदार कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न
मारहाण सुरू असतानाच संशयितांनी मानसच्या गळ्यातील ५ तोळे वजनाची (किंमत १ लाख ५० हजार रुपये) सोनसाखळी बळजबरीने हिसकावून घेतली. मानसाने या लुटमारीला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी धारदार कोयता काढून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत मानसाने पाथर्डी फाट्याच्या दिशेने धूम ठोकल्याने तो बालंबाल बचावला.

संशयित आरोपींच्या मुसक्या आवळल्या
या धाडसी चोरीची दखल घेत इंदिरानगर पोलिसांनी तातडीने तपासचक्र फिरवून तिघांना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये:
१. मोहित मोहन जावळे (१८, रा. सिन्नर)
२. ओम संजय आडके (१९, रा. सरदवाडी, सिन्नर)
३. यश संदीप देशमुख (१९, रा. पाथर्डी फाटा)

यांचा समावेश आहे. त्यांचा चौथा साथीदार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुंदे करत आहेत.
शैक्षणिक संस्थांच्या परिसरात संशयास्पद हालचाली आढळल्यास विद्यार्थ्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Advertisement

Comments

No comments yet.