अविश्वास ठराव फेटाळण्यासाठी लाच घेताना महिला सरपंच पतीसह जाळ्यात... हॉटेलबाहेर पकडले रंगेहाथ

Share:
Main Image
Last updated: 26-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ फेब्रुवारी - दिंडोरी तालुक्यातील रासेगाव - देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांवरील अविश्वास ठराव नामंजूर करण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना विद्यमान महिला सरपंचासह त्यांच्या पतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. जिल्हा व सत्र न्यायालयाने सरपंच मंदा विठ्ठल बेंडकुळे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नेमके प्रकरण काय?
रासेगाव - देहरेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचांवरील अविश्वास ठरावावरून राजकीय वातावरण तापले आहे. या ठरावावर गुरुवारी (दि. २६) विशेष ग्रामसभेत मतदान होणार आहे. हा ठराव फेटाळण्यासाठी मदत करण्याच्या बदल्यात सरपंच मंदा बेंडकुळे व त्यांचे पती विठ्ठल बेंडकुळे यांनी तक्रारदाराकडे ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती हा व्यवहार २५ हजार रुपयांत ठरला.

हॉटेलबाहेर रचला सापळा
तक्रारदाराने याप्रकरणी नाशिक 'एसीबी'कडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. मंगळवारी (दि. २४) रात्री संशयित दाम्पत्याने तक्रारदाराला नाशिकमधील दिंडोरी रोडवरील कुलकर्णी गार्डन हॉटेल परिसरात बोलावले. यावेळी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. हॉटेलबाहेर सरपंच मंदा बेंडकुळे यांनी १४ हजार तर त्यांच्या पतीने १ हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने दोघांना बेड्या ठोकल्या.

महत्त्वाचे मुद्दे:
कोठडी: न्यायालयाने महिला सरपंचाला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकृती बिघडली: अटकेनंतर पती विठ्ठल बेंडकुळे यांचा रक्तदाब अचानक वाढल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कारवाई: एसीबीचे अधीक्षक भारत तांगडे, अपर अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नेहा सूर्यवंशी व पथकाने ही यशस्वी कारवाई केली.
या कारवाईमुळे ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, अविश्वास ठरावाच्या नावाखाली सुरू असलेल्या 'सौदेबाजी'ची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.