राज ठाकरेंनी केले जपानी मुलीचे कौतुक... व्हिडिओही पोस्ट केला... कारण की..

Share:
Main Image
Last updated: 25-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २५ फेब्रुवारी - महाराष्ट्रात वास्तव्याला असलेली एक जपानी तरुणी दररोज एक मराठी शब्द शिकून त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करत आहे. तिच्या या कौतुकास्पद प्रयत्नाचे निमित्त साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'मराठी' भाषेच्या अस्मितेवरून पुन्हा एकदा 'स्वकीयांचे' कान टोचले आहेत. "परदेशी पाहुण्यांना इथल्या भाषेचा आदर वाटतो, मग इथल्याच काही लोकांना मुंबईची भाषा मराठी आहे हे मान्य करायला अडचण का वाटते?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे यांनी एका सविस्तर पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या असून, त्यात त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या अलीकडील मुंबई दौऱ्याचा संदर्भ दिला आहे.

परकीयांचे कुतूहल आणि स्वकीयांची उदासीनता
राज ठाकरे म्हणाले की, हजारो किलोमीटरवरून येणारे परदेशी पाहुणे इथल्या भाषेचा, संस्कृतीचा आणि इतिहासाचा आदर करतात. 'कोल्डप्ले'च्या ख्रिस मार्टिनपासून ते विविध देशांच्या राष्ट्राध्यक्षांपर्यंत अनेकांनी मुंबईत आल्यावर मराठीतून संवाद साधून इथल्या मातीचा सन्मान केला. मुंबईतील विदेशी दूतावासही मराठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करतात. मात्र, आपल्याच काही लोकांना मुंबईत अनेक भाषा आहेत असे म्हणून मराठीचे महत्त्व कमी करायचे असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

सरसंघचालकांवर निशाणा
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुंबईतील कार्यक्रमाचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, "मध्यंतरी सरसंघचालक मुंबईत एका कार्यक्रमाला येऊन गेले. आपण मुंबईत आहोत, आपण मराठी आहोत, त्यामुळे थोडाफार संवाद मराठीत साधावा असे त्यांना का वाटले नाही? हे माहित नाही." यावेळी त्यांनी माजी सरसंघचालक सुदर्शनजी यांचे उदाहरण दिले. सुदर्शनजींचे बालपण रायपूरमध्ये गेले असले तरी ते कर्नाटकात गेल्यावर आवर्जून कन्नड भाषेत संवाद साधायचे, याची आठवणही त्यांनी करून दिली.

Advertisement

मराठीला 'अर्थार्जनाची' भाषा बनवा
मराठी भाषिकांना आवाहन करताना राज ठाकरे म्हणाले की, परदेशी व्यक्ती आपल्या भाषेचा सन्मान करतातच, पण इथल्या मूठभर स्वकीयांना या भाषेत बोलायला लावण्यासाठी आपल्याला कंबर कसावी लागेल. "आपली भाषा 'ज्ञानाची' आणि 'अर्थार्जनाची' (रोजगार देणारी) बनवूया, जेणेकरून ती शिकल्याशिवाय कोणासमोरही पर्याय उरणार नाही," असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
"त्या जपानी मुलीला मनःपूर्वक धन्यवाद! तिचे हे कुतूहल आणि भाषेबद्दलचा आदर डोळे उघडणारा आहे."
— राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

राज ठाकरे यांची ही पोस्ट सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असून, मराठी भाषेच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे.

?s=20

Comments

No comments yet.