चोरट्यांची मजल देवापर्यंत... नाशिकच्या प्रसिद्ध मंदिरातून दोन किलो चांदीची मूर्ती लंपास...

Share:
Last updated: 24-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ फेब्रुवारी - शहरातील जुन्या नाशिक भागातील श्रद्धास्थान असलेल्या तिवंधा चौकातील प्रसिद्ध 'साक्षी गणेश' मंदिरात चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा गाभाऱ्यात प्रवेश करून सुमारे दोन किलो वजनाची चांदीची पुरातन मूर्ती चोरून नेली. या घटनेमुळे भाविकांमध्ये संताप व्यक्त होत असून भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरदिवसा धाडसी चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराचे पुजारी दिलीप चंद्रिकाप्रसाद दुबे (रा. हिरावाडी) यांनी रविवारी (दि. २२) सकाळी आपली नित्यपूजा आटोपली आणि ते काही कामानिमित्त घरी गेले होते. मंदिर उघडे असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला. मुख्य मूर्तीच्या शेजारीच असलेली दोन किलो वजनाची चांदीची मूर्ती चोरट्यांनी शिताफीने लंपास केली.

सीसीटीव्हीच्या आधारे शोध सुरू
पुजारी दुबे मंदिरात परतल्यानंतर मूर्ती गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ भद्रकाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज पोलीस तपासत असून, त्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे.

पोलीस तपास: या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार काकड करत आहेत. भरवस्तीत आणि प्रसिद्ध मंदिरात झालेल्या या चोरीमुळे मंदिर प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


नाशिक : रिक्षा प्रवासात महिलेच्या पर्स मधील दागिन्यांवर सहप्रवासी असलेल्या चोरट्यांनी डल्ला मारला. ही घटना दिंडोरीनाका ते म्हसरूळ दरम्यान घडली. या घटनेत सोनसाखळी व मंगळसुत्र असा सुमारे ६५ हजाराचा ऐवज चोरून नेला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माधुरी मधुकर कापडणे (६४ रा.वडजे मळा, म्हसरूळ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. कापडणे या सोमवारी (दि.२३) कामानिमित्त पंचवटी परिसरात आल्या होत्या. काम आटोपून त्या रिक्षाने घराकडे परतत असतांना ही घटना घडली. दिंडोरी नाका येथून त्या रिक्षाने प्रवास करीत असतांना सहप्रवासी असलेल्या अज्ञात भामट्याने त्यांच्या पर्समधील सुमारे ६५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी आणि मंगळसुत्र हातोहात लांबविले.  ही बाब कापडणे या म्हसरूळ येथे उतरल्या असता निदर्शनास आली. रिक्षाचालकास पैसे देण्यासाठी त्यांनी पर्स उघडली असता त्यात अलंकार नव्हते. पोलीस नाईक लोणारे तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.