पुणे, (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - राजकारणाच्या गजबजाटात आणि केंद्रातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतानाही, एका पित्यासाठी आपल्या मुलांचे यश आणि त्यांचे महत्त्वाचे टप्पे किती मोलाचे असतात, याचा प्रत्यय आज पाहायला मिळाला. केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आपली मुलगी सौम्या हिच्या दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने एक अत्यंत भावूक पोस्ट समाजमाध्यमांवर शेअर केली आहे. 'व्यस्त वेळापत्रकामुळे वेळ देऊ शकलो नाही, पण लेकीनं कधीच तक्रार केली नाही,' अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
'तिच्या नजरेतील आत्मविश्वासाने थकवा पळाला'
आजपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून सौम्याचाही आज पहिला पेपर होता. तिला परीक्षा केंद्रावर सोडायला स्वतः मोहोळ गेले होते. या प्रसंगाचे वर्णन करताना त्यांनी लिहिले की, "आज पहिल्या पेपरसाठी तिला परीक्षा केंद्रावर सोडताना मनात अनेक भावना दाटून आल्या. तिच्या डोळ्यांत एक वेगळाच आत्मविश्वास दिसत होता आणि त्या नजरेनं माझा सगळा थकवा विसरायला झाला."
सौम्याचा कौतुकास्पद प्रवास
मंत्री मोहोळ यांनी आपल्या व्यस्त दिनचर्येचा उल्लेख करत सौम्याचे कौतुक केले. ते म्हणाले:
संपूर्ण वर्षभर व्यस्त वेळापत्रकामुळे तिला हवा तसा वेळ देता आला नाही.
असं असूनही सौम्यानं कधीच तक्रार, नाराजी किंवा हट्ट केला नाही.
अत्यंत शांतपणे आणि चिकाटीने तिने आपला अभ्यास सुरू ठेवला.
"सौम्यासाठी आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा सुरू झाला आहे. वर्षभराचा तिचा प्रवास पाहिला तर मन नकळत भरून येतं," अशा शब्दांत त्यांनी पितृत्वाचा अभिमान व्यक्त केला.
शुभेच्छांचा वर्षाव
मंत्री मोहोळ यांनी ही पोस्ट शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्या या हळव्या रूपाचे कौतुक होत आहे. एका केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या मुलीच्या मेहनतीची दखल घेत जाहीरपणे तिचे कौतुक केल्यामुळे, ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांनी आपल्या लेकीला पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.