नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस... दोन लाखांचे मोबाईल आणि तीन दुचाकी लंपास...

Share:
Last updated: 24-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ फेब्रुवारी - शहर आणि परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा आता मोबाईल आणि दुचाकींकडे वळवला आहे. आडगाव पोलीस ठाणे हद्दीत दोन महागडे मोबाईल चोरीला गेल्याच्या घटना ताज्या असतानाच, पंचवटी, भद्रकाली आणि सातपूर परिसरातून तीन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या आहेत. या सर्व प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तपोवन अन् नीलगिरी बागेत मोबाईलवर डल्ला
मोबाईल चोरीची पहिली घटना तपोवन परिसरात घडली. माडसांगवी येथील रमेश श्याम वागेशरी (२०) हा तरुण शनिवारी (दि. २१) कपिला संगम भागातील एका मंदिरात दर्शनासाठी गेला होता. त्याने आपली बॅग दगडावर ठेवली असता, चोरट्याने संधी साधून बॅगेतील ३४ हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.
दुसरी घटना नीलगिरी बाग भागात घडली. श्यामकांत गजमल जाधव (रा. कोणार्क नगर) हे रविवारी (दि. १५) रासबिहारी लिंक रोडवरील आठवडे बाजारत भाजीपाला खरेदीसाठी गेले होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातील ७० हजार रुपये किमतीचा महागडा मोबाईल हातोहात लांबवला. या दोन्ही प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून हवालदार राजूळे व जाधव तपास करीत आहेत.

Advertisement

शहरातून तीन दुचाकी चोरीला
दुचाकी चोरीचे सत्रही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शहराच्या वेगवेगळ्या भागांतून तीन वाहने चोरीला गेली आहेत:
पंचवटी: युवराज नरेंद्र जाधव (रा. कर्णनगर) यांची पल्सर मोटारसायकल (MH 41 AX 2707) सोसायटीच्या पार्किंगमधून चोरीला गेली. (तपास: हवालदार कोरडे)
भद्रकाली: हकदार अक्रम खान (रा. भंगार बाजार) यांची डिस्कव्हर गाडी (MH 15 EK 8638) जिमखाना परिसरातून अज्ञात चोरट्यांनी पळवली. (तपास: हवालदार सूर्यवंशी)
सातपूर: बाजिंग मजहर सय्यद (रा. सारडा सर्कल) यांची ॲक्टिव्हा (MH 15 FG 5785) त्र्यंबक रोडवरील हुंडाई शोरूम परिसरातून चोरीला गेली. (तपास: हवालदार अनिल आहेर)

गर्दीच्या ठिकाणी मोबाईल सांभाळावा आणि दुचाकी पार्क करताना हँडल लॉकसोबतच अतिरिक्त सुरक्षेचा (उदा. चेन लॉक) वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Comments

No comments yet.