दारणा नदीत मासेमारी करताना काळाचा घाला; ट्यूब उलटल्याने मच्छीमाराचा बुडून मृत्यू

Share:
Main Image
Last updated: 23-Feb-2026

नाशिक (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - चेहडी शिवारातील दारणा नदी पात्रात मासेमारी करत असताना हवा भरलेला रबरी ट्यूब उलटून एका ४१ वर्षीय मच्छीमाराचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. रवी चंद्रभान पवार (४१, रा. जयप्रकाश नगर, सामनगाव रोड) असे मृत मच्छीमाराचे नाव आहे. मासेमारीसाठी टाकलेल्या जाळ्यातच पाय अडकल्याने रवी यांचा जीव गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रवी पवार हे रविवारी (दि. २२) दुपारी नेहमीप्रमाणे मासे पकडण्यासाठी चेहडी परिसरातील दारणा नदीच्या पात्रात गेले होते. नदीच्या मध्यभागी मासेमारी करत असताना अचानक त्यांच्याकडील हवा भरलेला रबरी ट्यूब उलटला. यामुळे रवी पाण्यात पडले. दुर्दैवाने, मासेमारीसाठी पाण्यात पसरवलेल्या जाळ्यात ते अडकले आणि त्यांना बाहेर पडता आले नाही.

जाळ्यात अडकल्याने गुदमरला श्वास
ट्यूब पलटी झाल्याने रवी हे पाण्यात पडले, मात्र जवळच असलेल्या जाळ्यात पाय अडकल्याने त्यांना पोहता आले नाही. त्यांना बेशुद्ध अवस्थेत काका बापू पवार आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी तात्काळ नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता कारे यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

नाशिकरोड पोलिसांत नोंद
या घटनेमुळे सामनगाव रोड परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, हवालदार पवार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

नदी पात्रात किंवा धरणाच्या साठ्यात रबरी ट्यूबच्या सहाय्याने मासेमारी करणे अनेकदा धोकादायक ठरू शकते. विशेषतः जाळी सोबत असताना अशा अपघातांची शक्यता वाढते, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.

पादचाऱ्याचा मोबाईल लांबवला..
नाशिक : रस्त्याने फोनवर बोलत जाणाऱ्या तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीस्वार भामट्यांनी हिसकावून नेला. ही घटना औद्योगीक वसाहतीतील शाम सुंदर मिसळ हॉटेल भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सत्यम अमरेश पासवान (रा.तिरंगा चौक, कामगारनगर) या युवकाने याबाबत फिर्याद दिली आहे. पासवान शनिवारी (दि.२१) रा६ी आपल्या कामावरून घराकडे पायी जात असतांना ही घटना घडली. रस्त्याने तो फोनवर बोलत पायी जात असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांनी त्याच्या हातातील ११ हजार रूपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला. हवालदार आहेर तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.