नाशिक, (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयासमोर मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या युवकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुजीत दास (२५, रा. जेहान सर्कल, मूळ रा. हॉटेल करी लिव्ह परिसर) असे या मृत युवकाचे नाव आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्याची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र रविवारी ही झुंज अपयशी ठरली.
एकाचा जागीच झाला होता मृत्यू
मंगळवारी (दि. १७) पहाटेच्या सुमारास समाधान रवींद्र देवरे (३२, रा. देऊर बु., जि. धुळे) आणि सुजीत दास हे दोघे गंगापूर रोडकडून अशोक स्तंभाच्या दिशेने दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन दुभाजकावर जोरात आदळली. या भीषण अपघातात समाधान देवरे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता, तर सुजीत दास हा गंभीर जखमी झाला होता.
पाच दिवस मृत्यूशी झुंज
अपघातानंतर सुजीतला तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये (एमव्हीपी रुग्णालय) दाखल करण्यात आले होते. त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. हे दोन्ही युवक गंगापूर रोडवरील एका नामांकित हॉटेलमध्ये कामाला होते. कामावरून परतत असतानाच हा काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला.
सरकारवाडा पोलिसांत नोंद
या अपघाताप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भरधाव वेग आणि पहाटेची वेळ यामुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अवघ्या काही दिवसांच्या अंतरात दोन तरुण सहकाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये आणि जेहान सर्कल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिक शहरातील सिग्नल आणि दुभाजकांजवळ रात्रीच्या वेळी किंवा पहाटे वाहन चालवताना वेग मर्यादित ठेवण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
१७ वर्षीय मुलीची आत्महत्या...
सिडकोत राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीने गळफास लावून घेत आपले जीवन संपविले. युवतीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जान्हवी सचिन शार्दुल (रा.मॉडर्न कॉलनी, स्वामी विवेकानंद नगर) असे मृत युवतीचे नाव आहे. जान्हवी शार्दुल हिने रविवारी (दि.२२) अज्ञात कारणातून दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरात पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच वडिल सचिन शार्दुल यांनी तिला तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.