राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव दौऱ्यावर .... या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती...

Share:
Main Image
Last updated: 23-Feb-2026

बुलढाणा, (प्रतिनिधी) २३ फेब्रुवारी - केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे विविध ठिकाणांना भेटी देऊन महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित दौऱ्याच्या पूर्वतयारीची सविस्तर पाहणी केली. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने येत्या २५ फेब्रुवारी रोजी शेगाव येथे ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ चे आयोजन करण्यात आले असून, या सोहळ्याला राष्ट्रपती महोदयांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्र्यांनी कार्यक्रम स्थळ, सुरक्षा व्यवस्था आणि इतर तांत्रिक बाबींचा बारकाईने आढावा घेतला.

या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री जाधव यांनी राष्ट्रपतींच्या आगमनासाठी तयार करण्यात येत असलेले हेलिपॅड, कडेकोट सुरक्षा बंदोबस्त आणि मुख्य सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली. राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यासाठी येणाऱ्या रुग्ण आणि नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था, विविध पॅथींचे स्टॉल्स, औषध वितरण केंद्र आणि रुग्ण तपासणीसाठी उभारण्यात येत असलेल्या विशेष स्टॉल्सच्या तयारीचा त्यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला. आरोग्य मेळाव्यात येणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासणार नाही आणि तपासणी प्रक्रिया सुलभ राहील, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित विभागांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी केंद्रीय मंत्र्यांसमवेत आमदार संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक  श्रेणिक लोढा उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी, यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या तयारीवर जाधव यांनी समाधान व्यक्त केले असून, राष्ट्रपतींचा हा दौरा आणि राष्ट्रीय आरोग्य मेळावा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

Comments

No comments yet.