शनि शिंगणापूर परिसरात 'एजंटगिरी'ला चाप... भाविकांची अडवणूक करणाऱ्यांवर...

Share:
Main Image
Last updated: 21-Feb-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - प्रसिद्ध तीर्थक्षेत्र शनि शिंगणापूर (ता. नेवासा) येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची अडवणूक, दिशाभूल आणि अनधिकृत मध्यस्थी करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कडक पाऊल उचलले आहे. शिंगणापूर गाव आणि बाहेरील परिसरात सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १५२ (१) (a) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

नेमका प्रकार काय?
शिंगणापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक रस्ते, चौक, बसस्थानक आणि प्रवेशद्वारांवर भाविकांना थांबवून त्यांची दिशाभूल करण्याचे प्रकार वाढले होते. काही व्यक्ती देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचे अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवून भाविकांना भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली लुबाडत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या उपद्रवामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत.

Advertisement

आदेशातील मुख्य निर्बंध:
मध्यस्थीस मनाई: गावाबाहेरील रस्ते, चौक किंवा बसथांब्यावर उभे राहून भाविकांना थांबवणे किंवा मध्यस्थी करण्याच्या कृत्यावर तात्काळ प्रतिबंध घालण्यात आला आहे.
खोटी ओळख सांगणे गुन्हा: कोणत्याही व्यक्तीने स्वतःला देवस्थानचा प्रतिनिधी भासवून अनाधिकृत कृत्य केल्यास त्यांच्यावर कारवाई होईल.
परिसर रिकामा करण्याचे निर्देश: अशा कृत्यांत गुंतलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणांहून तात्काळ हटण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

कारवाईचा इशारा
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. भाविकांच्या सोयीसाठी आणि शिंगणापूरची प्रतिमा जपण्यासाठी हे निर्बंध अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

"सार्वजनिक शांतता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हे आदेश लागू करण्यात आले आहेत. कुणीही भाविकांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास प्रशासन गय करणार नाही."
— सुधीर पाटील, उपविभागीय दंडाधिकारी

Comments

No comments yet.