एसटीच्या ८६ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते कधी मिळणार? मंत्री सरनाईक म्हणाले...

Share:
Main Image
Last updated: 21-Feb-2026

मुंबई, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - एसटीच्या सुमारे ८६  हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या २४ फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीच्या थकीत हप्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे शासनाने ती जबाबदारी उचलावी. अशी चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी केली होती. त्यानुसार त्यांच्या अनुमतीने  दरमहा सुमारे ६५ कोटी रुपये शासनाने अनुदान स्वरूपात एसटीला देण्याचे बैठकीमध्ये ठरले होते.

Advertisement

थकीत हप्ते डिसेंबर महिन्याच्या वेतनासोबत देण्यास सुरुवात झाली. तथापि, काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत सदर हफ्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे थकीत हप्ता न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात नाराजी पसरली. अशा परिस्थितीत काही कामगार संघटनांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला होता. ही गंभीर परिस्थिती ओळखून परिवहन मंत्री तथा  एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचीशी चर्चा करून या थकीत हप्त्यापोटी २१० कोटी रुपये तातडीने सरकारने एसटीला द्यावेत, अशी विनंती केली. यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला. त्यामुळे त्या २१० कोटी रुपयांपैकी १०० कोटी रुपये आज शासनाने दिले असून उर्वरित निधी देखील लवकरच प्राप्त होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे हप्ते कोणते परिस्थितीमध्ये देण्यात येतील, असे आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाच्या वतीने दिले आहे.

त्याचप्रमाणे, सध्या दहावी व बारावीच्या मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रवासात कोणते अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही संघटनांनी पुकारलेले आंदोलन तातडीने स्थगित करावे, असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

Comments

No comments yet.