मुंबई, (प्रतिनिधी) २२ फेब्रुवारी - एसटी बसमधून अर्ध्या तिकिटात प्रवास करणाऱ्या महिला आणि १०० टक्के सवलत घेणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आता महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. केवळ आधार कार्ड किंवा साधे ओळखपत्र दाखवून मिळणारी सवलत आता बंद होणार असून, सवलतीच्या प्रवासासाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' (NCMC) बंधनकारक करण्यात आले आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे लालपरीचा प्रवास आता पूर्णपणे 'कॅशलेस' होणार आहे.
काय आहे नवीन नियम?
आतापर्यंत महिलांना ५० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार सवलत आधार कार्ड दाखवून मिळत होती. मात्र, आता या प्रवाशांना एनएमसीएसी (NCMC) कार्ड घेणे अनिवार्य आहे. हे कार्ड केवळ ओळखपत्र नसून ते एक 'प्री-पेड वॉलेट' म्हणून काम करणार आहे. यामध्ये प्रवाशांना किमान १०० रुपयांचा बॅलन्स ठेवणे बंधनकारक असेल.
कार्डचे दर आणि सवलत:
नवीन कार्डसाठी: १९९ रुपये शुल्क मोजावे लागणार.
जुन्या कार्डधारकांसाठी: ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे, त्यांनी ते जमा केल्यास नवीन कार्ड सवलतीच्या दरात म्हणजेच १४९ रुपयांत दिले जाणार आहे.
पारदर्शकतेचा दावा, पण ग्रामीण भागात संताप
या कार्डमुळे प्रवास सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे. सवलतीची अचूक नोंद आणि रोखविरहित व्यवहारांमुळे गैरप्रकारांना आळा बसेल, असे परिवहन विभागाचे म्हणणे आहे. मात्र, ग्रामीण भागात या निर्णयाचा तीव्र विरोध होताना दिसत आहे. तासनतास रांगेत उभे राहून कार्ड काढणे, ते रिचार्ज करणे आणि तांत्रिक अडचणी हाताळणे ग्रामीण भागातील वृद्ध आणि महिलांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
प्रवाशांचा सवाल: > "फक्त आधार कार्डवर सहज मिळणारी सवलत आता इतकी क्लिष्ट करण्याचे कारण काय?" असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. कार्डसाठी पैसे मोजावे लागणे आणि त्यात बॅलन्स ठेवण्याची सक्ती यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री बसणार आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
कॅशलेस व्यवहार: प्रवासादरम्यान चिल्लर पैशांची कटकट संपणार.
पारदर्शकता: सवलतीचा लाभ घेणाऱ्यांची अचूक आकडेवारी सरकारला मिळणार.
सक्ती: कार्ड नसल्यास सवलतीचा लाभ मिळणे कठीण होणार.