नाशिकमध्ये गुंडागर्दी वाढली... मारहाण करत थेट इर्टीगा कारच पळवून नेली...

Share:
Last updated: 21-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - शहरातील छत्रपती संभाजी रोडवरील नांदूरनाका परिसरातून दोन मित्रांना शिवीगाळ व मारहाण करत संशयितांनी त्यांची इर्टीगा कार पळवून नेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या कारमध्ये २० हजार रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतिश जयवंत तांबे (रा. मुशीगाव, जि. पुणे) आणि त्यांचा मित्र अनिकेत वाघमारे हे दोघे गेल्या शनिवारी (दि. ७) त्यांच्या ताब्यातील इर्टीगा कार (क्रमांक: MH 14 LB 2408) धुण्यासाठी नांदूरनाका येथील 'नाठे टायर' या वॉशिंग सेंटरवर गेले होते. कार धुण्यासाठी नंबर लावलेला असताना, त्याठिकाणी संशयित संदिप गंगाधर शेळके (३७, रा. मुशीगाव, जि. पुणे) हा त्याच्या एका साथीदारासह आला.

मारहाण आणि धमकी
संशयितांनी कारमध्ये बसलेल्या अनिकेत वाघमारे याला विनाकारण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला मारहाण करत गच्ची धरून कारच्या बाहेर ओढले. वाघमारे याला बाजूला सारून संशयितांनी कारचा ताबा घेतला आणि ती पळवून नेली. यावेळी कारमध्ये २० हजार रुपयांची रोकड आणि वाहनाची मूळ कागदपत्रे होती. जाताना संशयितांनी सतिश तांबे यांनाही "नाशिकमधून कसा बाहेर पडतो तेच बघतो," अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस कारवाई:
याप्रकरणी सतिश तांबे यांच्या तक्रारीवरून आडगाव पोलिसांनी संदीप शेळके व त्याच्या साथीदाराविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदाळे करत आहेत.


नाशिक : दुकानातून व्यावसायिक महिलेची पर्स भामट्या ग्राहकांनी चोरून नेली. या पर्समध्ये ६५ हजाराची रोकड होती. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रणित इश्वर हिरवे (रा. चौकमंडई,जुने नाशिक) यांनी फिर्याद दिली आहे. हिरवे यांचे भद्रकाली फ्रुट मार्केट भागात द्वारकामाई फॅशन नावाचे कापड दुकान आहे. रविवारी (दि.१५) हिरवे यांच्या आई व्यवसाय सांभाळत असतांना ही घटना घडली. खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरलेल्या भामट्यांनी हिरवे यांच्या आईची पर्स होताहात लांबविली असून त्यात ६५ हजाराची रोकड होती. हवालदार मिलींद सुर्यवंशी तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.