पुण्यातील आकुर्डीत होणार हे भव्य केंद्र... मोदी सरकारचा मोठा निर्णय...

Share:
Main Image
Last updated: 21-Feb-2026

पुणे, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - जगातील प्रमुख जैवविविधता 'हॉटस्पॉट' असलेल्या पश्चिम घाटातील दुर्मिळ जीवसृष्टीचे शास्त्रीय दस्तऐवजीकरण आणि जतन करण्यासाठी पुण्यात एक मोठे पाऊल उचलले जात आहे. आकुर्डी येथील भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या (ZSI) पश्चिम प्रादेशिक केंद्रात 'पश्चिम घाट प्राणिशास्त्र नमुना संकलन केंद्र, सभागृह आणि संग्रहालयाची' पायाभरणी शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी करण्यात आली.
भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. धृती बॅनर्जी यांच्या हस्ते सकाळी ११:०० वाजता हा सोहळा पार पडणार आहे.

काय असेल या केंद्राचे वैशिष्ट्य?
हे केंद्र म्हणजे केवळ एक इमारत नसून, पश्चिम घाटाच्या समृद्ध वारशाचा वैज्ञानिक संग्रह असेल. याची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
प्रचंड साठवण क्षमता: पश्चिम घाट प्रदेशातून गोळा केलेल्या १० लाखांहून अधिक प्राण्यांच्या नमुन्यांचे येथे सुरक्षित जतन केले जाईल.
विविध प्रजातींचा समावेश: यात कीटक, मासे, उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी, सस्तन प्राणी आणि मृदुकाय प्राण्यांच्या दुर्मिळ नमुन्यांचा समावेश असेल.
अत्याधुनिक सुविधा: संशोधकांसाठी अत्याधुनिक वैज्ञानिक प्रयोगशाळा, सुसज्ज सभागृह आणि सामान्य जनतेसाठी माहितीपूर्ण संग्रहालयाची निर्मिती केली जाणार आहे.

संशोधन आणि संवर्धनाला मिळणार बळकटी
पश्चिम घाटात अनेक अशा प्रजाती आहेत ज्या जगाच्या पाठीवर इतर कोठेही आढळत नाहीत. या केंद्राच्या माध्यमातून:
१. नव्या प्रजातींचा शोध: नव्याने शोधलेल्या प्रजातींच्या 'टाईप स्पेसिमेन्स'चे (मूळ नमुने) सुरक्षित जतन होईल.
२. डिजिटल डेटाबेस: माहितीचे डिजिटायझेशन करून ती जागतिक स्तरावर उपलब्ध करून दिली जाईल.
३. तज्ञांचे मार्गदर्शन: हे केंद्र भविष्यात प्रजाती ओळख आणि वर्गीकरण तज्ञांसाठी एक मुख्य प्रादेशिक केंद्र म्हणून कार्य करेल.
"हे केंद्र राष्ट्रीय जैवविविधता दस्तऐवजीकरण कार्यक्रमांना बळकटी देईल आणि संवर्धन नियोजनासाठी आवश्यक वैज्ञानिक पुरावे उपलब्ध करून देईल," असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

विद्यार्थी, संशोधक आणि निसर्गप्रेमींसाठी हे केंद्र ज्ञानाचे एक नवीन दालन ठरणार असून, यामुळे पश्चिम घाटातील वन्यजीवांच्या दीर्घकालीन संवर्धनास मोठी मदत होणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.