नाशकात आणखी दोन महिलांचा विनयभंग... गुन्हे दाखल

Share:
Last updated: 21-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ फेब्रुवारी - शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असून, दोन वेगवेगळ्या भागात परिचितांनीच महिलांचा विनयभंग केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. याप्रकरणी अंबड आणि उपनगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रकरण १ : सिडकोत पाठलाग करून जाच
पहिली घटना सिडको भागात घडली आहे. संशयित हेमंत शरद गोरे (वय ४०, रा. मथुरा गार्डन शेजारी, कामटवाडे) हा गेल्या वर्षभरापासून (२०२४ पासून) पीडित महिलेला त्रास देत होता. संशयिताने वेळोवेळी महिलेकडे प्रेमाची मागणी घातली, फोनवरून संपर्क साधून मानसिक त्रास दिला, तसेच इमारतीसमोर उभे राहून तिचा पाठलागही केला. संशयिताच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने अखेर पोलीस ठाणे गाठले. अंबड पोलिसांनी याप्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक निरीक्षक स्वप्नाली पलांडे पुढील तपास करत आहेत.

प्रकरण २ : बोधले नगरमध्ये मारहाण अन् जीवे मारण्याची धमकी
दुसरी घटना नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगर परिसरात घडली. फिर्यादी महिला आणि त्यांच्या मुलाला किरकोळ कारणावरून संशयित नंदन विठ्ठल बगाडे, त्याची पत्नी आणि जयश्री बगाडे (सर्व रा. हेरंब पूजा रेसिडेन्सी) यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या वादादरम्यान नंदन बगाडे याने महिलेला ढकलून देत तिचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर, 'तुम्हा माय-लेकांना गोळ्या घालून ठार मारू' अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, हवालदार हिवाळे अधिक तपास करत आहेत.
शहरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात असून, पोलिसांनी अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक पावले उचलण्याची मागणी होत आहे.

नाशिक : धावत्या रेल्वेच्या धडकेत ३२ वर्षीय महिला ठार झाली. हा अपघात लोहशिंगवे शिवारातील पोल नं. १७१ -२५ येथे झाला. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मनिषा सुकदेव जुंद्रे (रा.लोहशिंगवे पो. शेणीत देवळाली कॅम्प) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. जुंद्रे या शुक्रवारी (दि.२०) रेल्वे रूळ ओलांडून पाणी भरण्यासाठी जात असतांना हा अपघातात झाला. पोल नं. १७१ -२५ भागातून त्या जात असतांना धावत्या रेल्वेने त्यांना धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत पती शांताराम जुंद्रे यांनी दिलेल्या खबरीवरून मृत्यूची नोंद करण्यात आली असून हवालदार जगदाळे तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.