हा तहसीलदार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात... यासाठी मागितली होती इतकी लाच...

Share:
Last updated: 20-Feb-2026

परळी, (प्रतिनिधी) २० फेब्रुवारी - बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकले आहेत. एका कामासाठी तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परळी तालुक्यासह बीड जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

नेमके प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराच्या कामासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र, तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे ठरले होते. यासंदर्भात संबंधित तक्रारदाराने बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.

Advertisement

एसीबीचा सापळा आणि कारवाई
तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परळी येथे सापळा रचला. दरम्यान, तहसीलदारांना तक्रारदाराच्या हालचालींवर संशय आल्याने त्यांनी पैसे स्वीकारण्यास काहीवेळ टाळाटाळ केली. मात्र, एसीबीच्या पथकाने या प्रकरणातील आवश्यक ते पुरावे संकलित केले असून तहसीलदार मुंडे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. सध्या तहसीलदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून बीड एसीबी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

महसूल विभागात खळबळ
परळीसारख्या महत्त्वाच्या तालुक्याच्या तहसीलदारावरच लाचलुचपत विभागाने कारवाई केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामुळे महसूल विभागाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Comments

No comments yet.