नाशिक, (प्रतिनिधी) १९ फेब्रुवारी - नाशिक शहरात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गेल्या २४ तासांत शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन महिलांनी पोलिसांत धाव घेत तक्रारी दिल्या आहेत. यामध्ये एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून १० वर्षे बलात्कार केल्याचा, तर अन्य दोन घटनांत घरात घुसून विनयभंग केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. याप्रकरणी म्हसरूळ, पंचवटी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. लिव्ह-इन पार्टनरकडून १० वर्षे अत्याचार (म्हसरूळ)
पहिली घटना दिंडोरी रोडवरील कलानगर भागात उघडकीस आली. पीडित महिला आणि संशयित राजेश दत्तात्रेय झनकर (रा. वरदनगर, बोरगड) हे २०१४ पासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. संशयिताने लग्नाचे आमिष दाखवून गेल्या दहा वर्षांपासून पीडितेवर वारंवार बलात्कार केला. २०२४ मध्ये महिलेने लग्नासाठी तगादा लावला असता, संशयिताने नकार देऊन विभक्त होण्याचा निर्णय घेतला.
बुधवारी (दि. १८) रात्री संशयिताने पीडितेचे घर गाठून तिला शिवीगाळ व लाकडाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात महिला जखमी झाली असून, म्हसरूळ पोलिसांनी फसवणूक व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक मयुरी तुरे अधिक तपास करत आहेत.
२. पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून विनयभंग (पंचवटी)
दुसरी घटना पंचवटीतील मोरे मळा परिसरात घडली. बुधवारी सकाळी पीडित महिला घरात एकटी असताना संशयित संदिप मोतीराम गांगुर्डे (३२) हा पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरला. त्याने महिलेचा विनयभंग करून ही बाब कोणास सांगितल्यास 'बघून घेईन' अशी धमकी दिली. धास्तावलेल्या महिलेने पंचवटी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. हवालदार सचिन आहेर या प्रकरणाचा तपास करत आहेत.
३. कौटुंबिक वादातून भावजयीचा विनयभंग (भद्रकाली)
तिसरी घटना खडकाळी भागात घडली असून, येथे कौटुंबिक वादातून मावस दिरानेच भावजयीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. समीर सादिक शेख (रा. जीपीओ रोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडितेचा मुलगा व नणंद यांच्याशी झालेल्या वादाची कुरापत काढून समीरने बुधवारी सकाळी पीडितेला व तिच्या सासूला शिवीगाळ व मारहाण केली.
यावेळी सासूला ढकलून देत त्याने पीडितेचा विनयभंग केला. इतकेच नव्हे तर कुटुंबाची रिक्षा व दुचाकी पेटवून देण्याची धमकीही दिली. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक निरीक्षक सपकाळे तपास करत आहेत.