प्रशासक आल्यापासून श्री शनेश्वर देवस्थानचा कारभार सुधारला का? भाविकांना फायदा की तोटा? बघा, आकडेवारी काय सांगते...

Share:
Main Image
Last updated: 18-Feb-2026

अहिल्यानगर, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - शनि शिंगणापूर येथील श्री शनेश्वर देवस्थान येथील बर्फी प्रसाद तयार करण्यासाठी  शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर प्रक्रिया करून पुरवठादार नेमल्याने विशिष्ट ब्रँडची मक्तेदारी संपुष्टात येऊन देवस्थान आणि भाविकांनादेखील याचा लाभ होणार आहे. प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्यानंतर बर्फी प्रसाद आणि तेलाची विक्री वाढल्याचे गेल्या ३ महिन्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त तथा प्रशासक डॉ.प्रवीण गेडाम यांनी दिले आहे.

बर्फी प्रसाद निर्मितीसाठी शिर्डी देवस्थानाच्या धर्तीवर  रीतसर प्रक्रिया करून पुरवठादार निवडण्यात आलेला आहे. यामुळे कामगार कायद्याचे पालन व सुलभतेने दर्जात्मक प्रसाद निर्मिती सुलभ होईल. यापूर्वी बर्फीकरिता विशिष्ट ब्रॅंडची मक्तेदारी असल्याने देवस्थानचे  आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले होते हे टाळण्यासाठी व देवस्थानला साहित्याचा पुरवठा विना अडथळा होण्यासाठी निविदाप्रक्रियेद्वारा विविध  साहित्य खरेदी करण्यात येत आहे. यामुळे देवस्थानला स्पर्धात्मक दराचा फायदा होईल व प्रक्रिया पारदर्शकता राहील . भविष्यातील खरेदी प्रक्रिया ही ई टेंडरद्वारे  राबविण्याबाबत शासन स्तरावर पत्रव्यवहार करून नोंदणी करण्यात आलेली आहे. 

बर्फी प्रसाद तयार करण्यासाठी यापूर्वी नियुक्त कारागीर यांची लेखी स्वरूपात नेमणूक करण्यात आलेली नव्हती. यासह सदरील बर्फी प्रसाद बनविण्यासाठी विशिष्ट ब्रॅंडचीच मागणी करण्यात येत असल्याचे  निदर्शनस आलेले होते व त्यामुळे देवस्थान प्रशासनाला स्पर्धात्मक दराचा फायदा होत नव्हता. दरम्यान देवस्थान प्रशासनातर्फे या सुधारणा होत असतांना प्रसाद किंवा तेल विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही हे मागील ३ महिन्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतांना दिसते.

Advertisement

बर्फी प्रसाद विक्री 
नोव्हेंबर:- ३ लाख १४ हजार ४५९ पाकिटे (रक्कम रु. ६२ लाख ८९ हजार १८० रुपये ) 
डिसेंबर : - ४ लाख ५२ हजार ८३५ पाकीटे ( रक्कम रु. ९० लाख ५६ हजार ७००) 
जानेवारी : - ५ लाख १० हजार ६२६ पाकीटे (रक्कम रु. १ कोटी २ लाख १२ हजार ५२०)

तेल विक्री 
नोव्हेंबर :- ३४ लाख ८४ हजार ९५४ रुपये 
डिसेंबर :- ३३ लाख ८ हजार २६७ रुपये 
जानेवारी;- ४६ लाख ५ हजार २४४ रुपये

वेतन बाबत जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर यांचेकडून  नियुक्त लेखा अधिकाऱ्यांकडून कार्यालयीन तपासणी सुरू असून लवकरच कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यात येईल.असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

देवस्थानचे कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करीत ते  पारदर्शकरित्या आणि नियमानुसार व्हावे यावर प्रशासनाचा भर असून भाविकांचा त्रास कमी होऊन त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या यावरही भर दिला जात आहे. देवस्थानचे महात्म्य आणि पावित्र्य अबाधित राखण्यासाठी  प्रशासनातर्फे आवश्यक सुधारणांवर भर दिला जात आहे. अर्थातच यात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचे वेतन वेळेवर व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे प्रशासनातर्फे दिलेल्या स्पष्टीकरणात नमूद करण्यात आले आहे.

Comments

No comments yet.