बारामती विमान अपघाताचा तपास कुठवर आला? तपास संस्था म्हणते...

Share:
Main Image
Last updated: 18-Feb-2026

नवी दिल्ली, (प्रतिनिधी) १८ फेब्रुवारी - बारामती येथे २८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या 'लियरजेट ४५' (Learjet 45 - VT-SSK) विमान अपघाताचा सविस्तर तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहचला आहे. या विमानाच्या 'डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर'मधील (DFDR) माहिती यशस्वीरीत्या मिळवण्यात यश आले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी हा डेटा अत्यंत महत्त्वाचा ठरणार असल्याची माहिती विमान अपघात तपास संस्थेने (AAIB) मंगळवारी प्रसिद्ध केली.

आगीमुळे रेकॉर्डरचे नुकसान
तपास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी विमानात दोन स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर होते. मात्र, अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत हे दोन्ही रेकॉर्डर दीर्घकाळ तीव्र उष्णतेच्या संपर्कात राहिल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे माहिती मिळवणे हे तपास पथकासमोर मोठे आव्हान होते.

Advertisement

तपासाची सद्यस्थिती:
फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR): एल३-कम्युनिकेशन्स बनावटीचा हा रेकॉर्डर 'एएआयबी'च्या प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाऊनलोड करण्यात आला आहे.
कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर (CVR): हनीवेल कंपनीच्या या रेकॉर्डरची तांत्रिक तपासणी सध्या सुरू आहे. त्यातील संवाद पुन्हा मिळवण्यासाठी (Data Recovery) ज्या देशात हे उत्पादन झाले, त्या देशाच्या अधिकृत प्रतिनिधींकडून विशेष तांत्रिक मदत मागवण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय मानकांनुसार चौकशी
हा तपास 'विमान नियम २०१७' आणि आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) मानकांनुसार अत्यंत पारदर्शक पद्धतीने केला जात आहे. ही चौकशी केवळ तांत्रिक पुराव्यांवर आधारित असेल, असेही संस्थेने स्पष्ट केले आहे.

तर्कवितर्क टाळण्याचे आवाहन
"अपघाताची चौकशी प्रक्रिया तांत्रिक आणि कायदेशीर निकषांनुसार सुरू आहे. नागरिकांनी आणि संबंधित घटकांनी या विषयावर कोणतेही तर्कवितर्क लढवू नयेत. तपासातील पुढील माहिती योग्य वेळी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल," असे आवाहन विमान अपघात तपास संस्थेने केले आहे.

Comments

No comments yet.