नाशिक, (प्रतिनिधी) १७ जानेवारी - शहरातील अमृतधाम परिसरात एका सराईत गुन्हेगाराने दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून दुचाकीस्वाराला चाकूचा धाक दाखवून लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली आहे.
नेमकी घटना काय?
फिर्यादी निखील कैलास अंभोरे (१९, रा. जेलरोड) हा तरुण सोमवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास पंचवटीतून जेलरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर जात होता. अमृतधाम परिसरातील बाईसाहेब हॉटेलमार्गे जात असताना, पाटाजवळील जांभळीच्या झाडाजवळ दबा धरून बसलेल्या संशयिताने निखीलला अडवले.
चाकूचा धाक आणि मारहाण
संशयित योगेश बाळकृष्ण चव्हाण याने निखीलकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. निखीलने पैसे देण्यास नकार देताच संशयिताने संतापून कमरेला असलेला धारदार चाकू काढला आणि निखीलच्या मानेवर लावला. "पैसे काढ नाहीतर जीवे ठार मारेन," अशी धमकी देत त्याने शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली.
रोख रक्कम लांबवून पोबारा
धमकावल्यानंतर संशयिताने निखीलच्या खिशातील १ हजार ३०० रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. इतक्यावरच न थांबता त्याने निखीलला लाथ मारून दुचाकीवरून खाली पाडून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला.
पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार
या घटनेनंतर निखील अंभोरे याने तात्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित योगेश चव्हाण हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ अधिक तपास करत आहेत.