बचतगटातील महिलांच्या वस्तू विक्रीसाठी सामूहिक व्यासपीठ मिळणार...

Share:
Main Image
Last updated: 17-Feb-2026

नाशिक, येवला, अंदरसूल (प्रतिनिधी) १७ फेब्रुवारी - बचतगटाच्या माध्यमातून महिला विविध वस्तूंचे उत्पादन घेतात. मात्र योग्य मार्गदर्शन व विक्री करण्याची व्यवस्थित यंत्रणा नसल्याने वस्तूची विक्री होत नाही. यासाठी सामुहिक व्यासपीठ निर्माण करणे आवश्यक आहे. या माध्यमातून महिलांनी निर्माण केलेल्या वस्तू या ग्राहकांच्या समोर येतील आणि त्याची चांगली विक्री व्यवस्था निर्माण होईल. त्यासाठी आपले प्रयत्न असून मंत्री छगन भुजबळ व माजी खासदार समीर भुजबळ यांच्या माध्यमातून आपण बचतगटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री होण्यासाठी सामूहिक व्यासपीठ निर्माण करू, असे प्रतिपादन मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉ.शेफाली भुजबळ यांनी केले. 

राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून बचतगटातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने बचतगट मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज डॉ.शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत अंदरसूल गटामधील महिला बचत गटांना मार्गदर्शन व हळदी कुंकू समारंभ आज कोटमगाव येथील जगदंबा लॉन्स येथे तर पाटोदा गटातील महिलांसाठी रामेश्वर पॅलेस,पाटोदा येथे पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते विजयी महिलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, जलचिंतनसेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, शहराध्यक्ष दत्ता निकम,  माजी जिल्हा परिषद सभापाती संजय बनकर, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती किसनकाका धनगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब पिंपरकर, ज्येष्ठ नेते लक्ष्मण कदम, रतन बोरनारे, मकरंद सोनवणे, सचिन कळमकर, देविदास शेळके, गणपत कांदळकर, ब्रम्हकुमारी नीता दीदी, डॉ. स्वाती सोनवणे, सरपंच ज्योती शेलार, सरपंच मोनाली घोरपडे, मजूर संघाच्या संचालक सविता धनवटे, विनिता सोनवणे, उज्ज्वला पैठणकर, महिला शहराध्यक्षा राजश्री पहिलवान, आबा पाटील, संतोष खैरनार, क्लस्टर कोऑर्डीनेटर शुभम पवार, विशाल ठमके यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.

यावेळी डॉ. शेफाली भुजबळ म्हणाल्या की, बचतगट हे महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाचे प्रभावी माध्यम असून संघटित प्रयत्नांमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त होते. महिलांनी बचतीची सवय जोपासून लघुउद्योग, व्यवसाय व कौशल्याधारित उपक्रम राबवून स्वतःसह समाजाच्या विकासात योगदान द्यावे तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि आत्मविश्वासाने स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता विकसित करावी, असेही त्यांनी नमूद केले. या शिबिरामुळे महिलांमध्ये उद्योजकतेबाबत जागरूकता निर्माण होऊन आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी दृक्षश्राव्य माध्यमातून मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित महिलांना मागर्दर्शन केले. ते म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने बचतगटातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यात देण्याचा आपला प्रयत्न आहे. या माध्यमातून महिलांना योग्य मार्दर्शन प्रशिक्षण देऊन नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या उपक्रमातून महिलांना स्वतःची ओळख निर्माण करू शकणार आहे. त्यातून त्या आपले उज्ज्वल भविष्य निर्माण करू शकतील असे सांगत महिलांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी झी मराठी फेम अभिनेते संदीप जाधव यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध मनोरंजनाचे खेळ घेतले. या खेळात सहभागी होऊन विजयी झालेल्या महिलांना विविध बक्षिसे देण्यात आली. या मध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नागेश गवळी यांनी केले.

Advertisement

Comments

No comments yet.