नाशिक, (प्रतिनिधी) १६ फेब्रुवारी - शहरातील पेठरोडवरील वर्दळीच्या शरदचंद्र पवार मार्केट (बाजार समिती) परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. शनिवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दोन दुकाने लक्ष्य करत गल्ल्यातील रोकड, सीसीटीव्ही यंत्रणा आणि महागड्या ड्रायफ्रूट्ससह सुमारे ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरावाडीतील कमलनगर भागात राहणारे खाद्यतेल व्यावसायिक सचिन श्रीनिवास मुंदडा यांचे शरदचंद्र पवार मार्केट परिसरात 'लक्ष्मीनारायण अँड सन्स' नावाचे तेलाचे दुकान आहे. शनिवारी (दि. १४) रात्री दुकान बंद असताना मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरीचा प्रकार आणि मुद्देमाल
चोरट्यांनी मुंदडा यांच्या दुकानातून गल्ल्यातील रोकड आणि तेलाचे पाच बॉक्स लंपास केले. धक्कादायक म्हणजे, आपली ओळख पटू नये यासाठी चोरट्यांनी दुकानातील सीसीटीव्ही यंत्रणा आणि टीव्हीदेखील सोबत नेला. मुंदडा यांच्या दुकानासोबतच शेजारील सचिन ठक्कर (रा. पोकार कॉलनी) यांचे ड्रायफ्रूटचे दुकानही चोरट्यांनी फोडले. ठक्कर यांच्या दुकानातून महागडे काजू, बदाम आणि पिस्ता असा हजारो रुपयांचा माल चोरीला गेला आहे.
दोन्ही दुकानांतून मिळून एकूण ४१ हजार ९०० (सुमारे ४२ हजार) रुपयांचा माल चोरीला गेल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर परिसरात व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सचिन मुंदडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
नाशिक : हद्दपारीची कारवाई करूनही शहरात वावरणाऱ्या सराईताच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. औद्योगीक वसाहतीतील अशोकनगर भागात ही कारवाई करण्यात असून त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला आहे. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहूल रविंद्र खरात (२५ रा. अशोकनगर बसस्टॅण्ड जवळ,सातपूर) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. खरात याच्या वाढत्या गुन्हेगारीस रोखण्यासाठी शहर पोलीसांनी त्याच्याविरोधात तडिपारीची कारवाई केली आहे. शहर आणि जिह्यातून त्यास हद्दपार केलेले असतांनाही त्याचा वावर शहरातच होता. पोलीस त्याच्या मागावर असतांना रविवारी (दि.१५) सायंकाळच्या सुमारास तो साईनाथ हॉस्पिटल समोरील नाशिक ब्रॅण्डी हाऊस भागात मिळून आला. त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता सापडला आहे. याबाबत अंमलदार तुषार देसले यांनी दिलेल्या फिर्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार अनिल आहेर तपास करीत आहेत.