नाशिक, (प्रतिनिधी) १५ फेब्रुवारी - आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अग्निसुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा सविस्तर आढावा बुधवारी स्मार्ट सिटी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीस नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त सौरिश सहाय, नाशिक महानगरपालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय बैरागी, मालेगावचे मुख्य अग्निशमन अधिकारी संजय पवार, ठाणेचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, अहिल्यानगरचे मुख्य अग्निशमन अधिकारी शंकर मिसळ, तसेच त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील आदी उपस्थित होते.
साधुग्राम, घाट परिसर, पार्किंग क्षेत्र, होल्डिंग एरिया आणि प्रस्तावित तंबू वसाहती या ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला. राज्यातील इतर महानगरपालिकांकडून मनुष्यबळ व उपकरणांची उपलब्धता, अतिरिक्त अग्निशमन बंबांची तैनाती, आवश्यक यंत्रसामग्रीची वाढ आणि विभागांमधील समन्वय यावर चर्चा झाली. अपेक्षित भाविक संख्येच्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाचे क्षेत्रनिहाय नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
संभाव्य धोक्यांची ओळख, संवेदनशील भागांचे मॅपिंग, तसेच स्मार्ट सिटी आयसीसीसी, जिल्हा आपत्ती संचालन केंद्र आणि अग्निशमन नियंत्रण कक्ष यांचे एकत्रीकरण करून तात्काळ प्रतिसाद यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात आला. संयुक्त मॉक ड्रिल्स आणि प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याचाही निर्णय घेण्यात आला.
त्र्यंबकेश्वर येथे तात्पुरती अग्निशमन केंद्रे, स्टेजिंग एरिया आणि पर्वणीच्या दिवशी विशेष तैनाती याबाबतही चर्चा झाली. नाशिक महानगरपालिका, त्र्यंबक नगरपरिषद, महाराष्ट्र अग्निशमन सेवा, पोलीस व अन्य विभागांमध्ये प्रभावी समन्वय राहावा, यासाठी ठोस कार्ययोजना आखण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
आयुक्त शेखर सिंह यांनी सर्व विभागांनी निश्चित कालमर्यादेत तयारी पूर्ण करून प्रतिबंधात्मक व प्रतिसादात्मक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश दिले. “सुरक्षा नियोजन हे सक्रिय, तंत्रज्ञानाधारित आणि गर्दी व्यवस्थापनाशी पूर्णपणे एकात्मिक असणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने पुढील काळात टप्प्याटप्प्याने आढावा बैठका आणि संयुक्त मॉक ड्रिल्स घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar