नाशिक, (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी - झेरॉक्स काढण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडलेल्या दहावीतील तीन मैत्रिणींनी चक्क चेहडी शिवारातील एका निर्जन पेरूच्या बागेत रात्र काढल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उशीर झाल्यामुळे घरचे रागावतील, या भीतीपोटी या मुलींनी हा टोकाचा निर्णय घेतला. सुदैवाने, नाशिकरोड पोलिसांच्या १० तासांच्या अथक शोधमोहिमेनंतर या तिघीही सुखरूप मिळून आल्या असून, त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
अभ्यासाच्या बहाण्याने पडल्या बाहेर
मिळालेल्या माहितीनुसार, मालधक्का परिसरातील या तीन मैत्रिणींपैकी दोन सख्या बहिणी आहेत. मंगळवारी (दि. १०) दुपारी त्या अभ्यासासाठी एकत्र जमल्या होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास 'झेरॉक्स काढायला जातो' असे सांगून त्या घराबाहेर पडल्या. मात्र, सायंकाळ उलटूनही त्या घरी न परतल्याने पालकांची घाबरगुंडी उडाली. नातेवाईक, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानक परिसर पिंजून काढूनही मुलींचा पत्ता लागला नाही.
पोलिसांची रात्रभर शोधमोहीम
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी तातडीने शोध पथके रवाना केली. बुधवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी चेहडी पंपिंग स्टेशन परिसरात शोध मोहीम तीव्र केली. संपूर्ण रात्र पोलीस आणि कुटुंबीय मुलींचा शोध घेत होते. अखेर पहाटेच्या सुमारास या तिघीही मुली एका निर्जन पेरूच्या बागेत अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत मिळून आल्या.
पालक रागावतील म्हणून घेतला आश्रय
पोलिसी खाक्या दाखवण्याऐवजी प्रेमाने विचारपूस केली असता, मुलींनी सांगितलेले कारण ऐकून पोलीसही थक्क झाले. "बाहेर फिरायला गेल्यामुळे घरी परतण्यास उशीर झाला होता. आता घरी गेलो तर आई-वडील खूप रागावतील आणि मारतील, या भीतीपोटी आम्ही घरी न जाता या निर्जन बागेतच रात्र काढण्याचा निर्णय घेतला," असे त्यांनी सांगितले.
सुदैवाने अनुचित प्रकार टळला
ज्या ठिकाणी या मुली थांबल्या होत्या, तिथे किर्र अंधार असून रात्रीच्या वेळी कोणीही फिरकत नाही. अशा निर्जन स्थळी तीन अल्पवयीन मुलींनी रात्र काढणे अत्यंत जोखमीचे होते. सुदैवाने त्यांच्यासोबत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांनी या मुलींचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.
पालकांसाठी धडा:
"मुलांशी संवाद वाढवा. मुले एखादी चूक करून घरी आली तर त्यांना धाक दाखवण्यापेक्षा विश्वासात घ्या, जेणेकरून भीतीपोटी ती असे टोकाचे पाऊल उचलणार नाहीत," असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar