नाशिक, (प्रतिनिधी) १४ फेब्रुवारी - न्यायालयीन समन्स आणि अटक वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांशी झटापट करत, एका संशयिताने पोलिसाच्या बोटाचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना मखमलाबाद भागात घडली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून म्हसरूळ पोलिसांनी संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
सुभाष दत्तात्रय राजोळे (रा. मेनरोड, मखमलाबाद) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. राजोळे याच्याविरुद्ध २०१८ पासून धनादेश न वटल्याप्रकरणी (चेक बाउन्स) विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत. दोन स्वतंत्र न्यायालयांनी वारंवार समन्स बजावूनही तो हजर राहत नसल्याने अखेर न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अटकेचे आदेश दिले होते.
असा घडला थरार...
घोटी पोलीस ठाण्याचे अंमलदार एस. टी. खैरे आणि म्हसरूळचे सोमनाथ गुंबाडे हे राजोळेला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले होते. घरी कोणी नसल्याने पोलिसांनी घराबाहेर वॉरंट चिकटवले आणि ते परतत असताना, त्यांना मखमलाबाद बसस्थानक परिसरात राजोळे दिसून आला. पोलिसांची चाहूल लागताच त्याने रिक्षातून पळ काढण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांशी झटापट आणि चावा
पोलीस अंमलदारांनी शिताफीने त्याला पकडल्यानंतर संशयिताने रौद्र रूप धारण केले. त्याने पोलिसांना धक्काबुक्की आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी झालेल्या झटापटीत त्याने एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बोटाचा जोरात चावा घेतला. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल
हवालदार सोमनाथ गुंबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित सुभाष राजोळे याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, पोलिसांना मारहाण करणे आणि धमकावणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar