जमीन मालकांनो, १ तारखेपासून यात होणार वाढ...

Share:
Main Image
Last updated: 13-Feb-2026

जळगाव, (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी - जळगाव जिल्ह्यातील भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनींचे वर्ग-१ मध्ये रूपांतरण करून घेण्यासाठी जमीनधारकांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. १ एप्रिल २०२६ पासून नवीन मूल्यांकन दर (ASR) लागू होणार असल्याने, त्यापूर्वीच अर्ज सादर करून वाढीव आर्थिक भुर्दंड टाळावा, असे आवाहन तहसीलदार (महसूल) ज्योती गुंजाळ यांनी केले आहे.

नवा नियम काय सांगतो?
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या ४ मार्च २०२५ च्या अधिसूचनेनुसार, 'महाराष्ट्र जमीन महसूल नियम २०२५' अंमलात आले आहेत. यानुसार, ज्या शासकीय जमिनींचा मूळ मंजूर प्रयोजनासाठी किमान ५ वर्षे प्रत्यक्ष वापर पूर्ण झाला आहे, अशा जमिनी वर्ग-१ (मालकी हक्क) मध्ये रूपांतरित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज करता येईल.

अधिमूल्य (नजराणा) दर कसे असतील?
३१ डिसेंबर २०२५ नंतरच्या नियमांनुसार जमिनीच्या वापरानुसार खालीलप्रमाणे दर निश्चित करण्यात आले आहेत:
कृषी जमीन (ग्रामीण): ग्रामपंचायत किंवा नगरपालिका हद्दीबाहेरील जमिनींसाठी चालू बाजारमूल्य (ASR) दराच्या ७५ टक्के.
निवासी, वाणिज्यिक व औद्योगिक: या प्रयोजनासाठी ASR किमतीच्या ६० ते ७५ टक्के दर लागू राहतील.
शहरी भाग: नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि विशेष नियोजन प्राधिकरण हद्दीतील जमिनींसाठीही सुधारित ASR दरानुसार अधिमूल्य निश्चित केले आहे.

३१ मार्चपूर्वी अर्ज करणे का फायद्याचे?
सन २०२५-२६ चे सुधारित मूल्यांकन दर दि. १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत. जर नागरिक १ एप्रिलनंतर अर्ज करतील, तर त्यांना नवीन (वाढीव) दराने नजराणा भरावा लागेल. त्यामुळे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी मार्च अखेरपर्यंत अर्ज करणे हिताचे ठरेल.

तहसीलदारांचे आवाहन: "जळगाव जिल्ह्यातील पात्र जमीनधारकांनी आवश्यक कागदपत्रांसह आपल्या संबंधित तहसील कार्यालयात मार्च २०२६ पूर्वी अर्ज सादर करावेत, जेणेकरून सध्याच्या दरांचा लाभ घेता येईल."
— ज्योती गुंजाळ, तहसीलदार (महसूल), जळगाव.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.