नाशिक, (प्रतिनिधी) १३ फेब्रुवारी - नाशिक शहरात रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असून, गेल्या २४ तासांत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये एका ६५ वर्षीय वृद्धाचा धावत्या वाहनातून पडून, तर एका ३३ वर्षीय तरुणाचा आयशर ट्रकच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या दोन्ही घटनांनी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
धावत्या 'छोटा हत्ती'तून पडल्याने वृद्धाचा मृत्यू
पहिली घटना महामार्गावरील आडगाव शिवारात घडली. देविदास भाऊसिंग पवार (वय ६५, रा. वटार, ता. सटाणा) असे मृत वृद्धाचे नाव आहे. पवार हे बुधवारी (दि. ११) रात्री ११ वाजेच्या सुमारास सटाणाहून नाशिकच्या दिशेने 'छोटा हत्ती' या मालवाहू टेम्पोतून प्रवास करत होते.
महामार्गावरील डी-मार्ट परिसरात आले असता, अचानक तोल गेल्याने ते टेम्पोच्या ट्रॉलीतून थेट रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठा रक्तस्राव झाला. चालकाने त्यांना तातडीने आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉ. रोहित लोणारे यांनी त्यांना मृत घोषित केले. आडगाव पोलीस ठाण्याचे हवालदार बहिरम याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
आयशर ट्रकची दुचाकीला समोरासमोर धडक; तरुण ठार
दुसरी घटना बळी मंदिर परिसरात गुरुवारी (दि. १२) रात्री घडली. विलास हिरामण राऊत (वय ३३, रा. मोहाचापाडा, ता. पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. राऊत हे आपल्या दुचाकीवरून यश लॉन्सकडून बळी मंदिराच्या दिशेने जात असताना, समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत राऊत गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, हवालदार राजूळे तपास करत आहेत.
सावधान!
महामार्गावरील वाढती वाहतूक आणि वेगावर नसलेले नियंत्रण यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. रात्रीच्या वेळी प्रवास करताना वाहनधारकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक बनले आहे.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar