नाशिक, (प्रतिनिधी) १२ फेब्रुवारी - शहरातील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जीएसटी (GST) आणि प्राप्तिकर (Income Tax) भरण्याच्या बहाण्याने दोन टॅक्स कन्सल्टंट भावांनी तब्बल २ कोटी ४२ लाख ६० हजार ५३५ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी कैलास भाऊसाहेब कराळे (रा. गोविंदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कराळे यांची 'धनंजय कन्स्ट्रक्शन' नावाची फर्म असून, संशयित ललित ज्ञानेश्वर कदम आणि शशांक ज्ञानेश्वर कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या फर्मच्या ताळेबंधाचे (Balance Sheet) कामकाज पाहत होते.
असा झाला भांडाफोड
२०१९ मध्ये कदम बंधूंनी फर्मच्या कामाचा आढावा घेऊन कर भरण्यासाठी कराळे यांच्याकडून २ कोटी २५ लाख ३७ हजार ८१६ रुपये घेतले होते. मात्र, त्यापैकी केवळ १ कोटी २४ लाख ४६ हजार ०३५ रुपयेच सरकारी तिजोरीत भरले गेले. उर्वरित मोठी रक्कम कदम बंधूंनी शासकीय विभागात न भरता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. कराळे यांना जेव्हा प्राप्तिकर विभाग आणि वस्तू व सेवा कर विभागाकडून (GST) थकबाकीच्या नोटिसा आल्या, तेव्हा त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
व्याजासह अडीच कोटींचा फटका
संशयितांनी रकमेचा परस्पर वापर केल्यामुळे मूळ रक्कम आणि त्यावर बसलेले सरकारी व्याज असा मिळून कराळे यांच्या फर्मचे एकूण २ कोटी ४२ लाख ६० हजार ५३५ रुपयांचे नुकसान झाले आहे. विश्वासू असलेल्या सल्लागारांनीच अशा प्रकारे फसवणूक केल्याने बांधकाम क्षेत्रात मोठी खळबळ माजली आहे.
पोलीस तपास सुरू
फिर्यादीनंतर मुंबई नाका पोलिसांनी ललित कदम आणि शशांक कदम या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, या आर्थिक गुन्ह्यात आणखी कोणाचे लागेबांधे आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
नाशिक : शहरात जबरीचोरीचे प्रमाण वाढले असून बुधवारी (दि.११) वेगवेगळ्या भागात चेन स्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या. रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेसह दुकानात शिरून व्यावसायीक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र भामट्यांनी ओरबाडून नेले. या घटनांमध्ये दोन तोळे वजनाचे गंठण आणि दीड तोळे वजनाची पट्टापोत चोरट्यांनी हिसकावून नेली असून याप्रकरणी पंचवटी व नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सुनिता शांतीलाल बारवाल (रा.पदमपुरा छत्रपती संभाजीनगर) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. बारवाल या पंचवटीतील कुमावत नगर भागात राहणाºया आपल्या भावाच्या घरी आल्या होत्या. नातूची अचानक तब्बेत बिघडल्याने त्या बुधवारी सायंकाळच्या सुमारास भावाच्या सूनेस व नातवास सोबत घेवून परिसरातील दवाखान्यात गेल्या असता ही घटना घडली. कॅनोल रोडवरील ओम ईशान अपार्टमेंट समोर पाठीमागून पळत आलेल्या इसमाने त्यांच्या गळ््यातील सुमारे ९० हजार रूपये किमतीचे गंठण हिसकावून नेले. यानंतर भामट्यांनी दुचाकीवर पोबारा केला असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार सागर कुलकर्णी तपास करीत आहेत. दुसरी घटना शिंदे पळसे येथे घडली. सुनिता सचिन दौंड (रा.पळसे ता.जि.नाशिक) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. दौंड यांचे गावातील चौधरी बिल्डर्स आॅफिस भागात गौरी कलेक्शन नावाचे साडी विक्रीचे दुकान आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास त्या आपल्या दुकानात व्यवसाय सांभाळत असतांना दुचाकीवर डबलसिट आलेल्या भामट्यांपैकी एकाने दुकानात प्रवेश केला. हात रूमाल खरेदीच्या बहाण्याने आलेल्या चोरट्यांने दौंड यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील सुमारे ६० हजार रूपये किमतीची पट्टा पोत हिसकावून पोबारा केला. याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हवालदार पाटील तपास करीत आहेत.
'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे.
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar