भारतातील सर्वात जास्त लांबीचा उड्डाणपूल महाराष्ट्रात... अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये...

Share:
Main Image
Last updated: 12-Feb-2026

नागपूर, (प्रतिनिधी) १२ फेब्रुवारी - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नागपूर येथे राष्ट्रीय महामार्ग NH- 353 D वर इंदोरा चौक - दिघोरी चौक उड्डाणपुलाचे बांधकाम करत आहे. अल्ट्रा हाय परफॉर्मन्स रिइन्फोर्सड काँक्रीट अर्थात युएचपीएफआरसी तंत्रज्ञान वापरून बांधलेला हा भारताचा सर्वात जास्त  लांबीचा  उड्डाणपूल आहे. या प्रकल्पातील 73 टक्क्यांच्या वर बांधकाम पूर्ण झाले असून जून 2026 पर्यंत त्याचे लोकार्पण होण्याचे उद्दिष्ट आहे.

एनएचएआय नागपूरचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांनी मंगळवारी वार्ताहरांना या पुलाची धावती भेट घडवली व माहिती दिली. नागपूरमधल्या अतिशय गर्दीच्या इंदोरा चौक, शीतला माता चौक व दिघोरी चौक या मार्गिकेमधील वाहतूक कोंडी दूर करून रस्ता सुरक्षितता राखण्यासाठी हा 998 कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प बांधला जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

संपूर्ण प्रकल्पाची लांबी 8.9 किमी असून त्यात 6.37 किमी चा उड्डाणपूल व 13.82 किमी लांबीचा सर्व्हिस व स्लिप मार्ग समाविष्ट आहे. या उड्डाणपुलाचा कॅरेजवे 12 मीटरचा  असून त्यात दुतर्फा  2 लेन आहेत.

या प्रकल्पात युएचपीएफआरसी तंत्रज्ञान वापरल्यामुळे अधिक लांबीचे स्पॅन ठेवता आले आहेत.  त्यामुळे उड्डाणपुलाची देखभाल सोयीची झाली आहे व त्याचे आयुष्य वाढले आहे. भांडे प्लॉट चौक व दिघोरी दरम्यानच्या भागाला युएचपीएफआरसी गर्डर्स चा आधार दिला आहे. त्यामुळे पूर्णपणे अशा तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला भारतातला हा एकमेव उड्डाणपूल आहे.

पाचपावली येथील रस्त्यावरून जाणारा आणि रस्त्याखालून जाणारा पादचारी पूल, सध्याच्या पादचारी पुलाची पुनर्बांधणी, डागा स्मृती महिलांच्या रुग्णालयाजवळचे चढाव रस्ते अर्थात  रॅम्प आणि अग्रसेन चौकातील मेट्रो मार्ग ओलांडणारा उड्डाणपूल हे या प्रकल्पातील महत्वाचे घटक आहेत. अशोक चौकात खांबांच्या आधाराने बांधलेला व महत्वाच्या शहरी रस्त्यांना जोडणारा उन्नत रोटरी रस्ता देखील बांधून पूर्ण झाला आहे.

उड्डाणपुलाच्या खालून जाणाऱ्या रस्त्यावरून तीन मोठ्या आणि अकरा लहान जंक्शन वरील सुधारणांसहित वाहतूक सुरळीत सुरु राहण्यासाठी काम सुरू आहे.

हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यावर भंडारा आणि उमरेडकडे जाणारी वाहतूक निराळ्या रस्त्याने जाईल व इंदोरा दिघोरी या गर्दीच्या मार्गिकेवरील वाहतूक कोंडी खूप कमी होईल. त्यामुळे रस्ता सुरक्षित होईल व प्रवासाचा वेळही कमी होईल.

हरित महामार्ग उपक्रम:

एनएचएआय च्या हरित महामार्ग उपक्रमाचे पालन या प्रकल्पात होत असून त्याअंतर्गत नागपूर भागात मोठ्या प्रमाणात पर्यावरणस्नेही उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग 44 वरील जामठा क्लोव्हरलीफ येथील 8.23 हेक्टर क्षेत्रफळाचे पक्षी उद्यान,  27 हजाराहून अधिक वृक्ष असलेली तीन मियावाकी जंगले, तसेच क्लोव्हरलीफ इंटरचेंजेस वरील 4 प्राणवायू उद्याने यांचा समावेश असून त्यामुळे महामार्गावरील मोकळ्या जागांवर हरित परिसंस्था उभ्या राहिल्या आहेत.

 

'सुपरफास्ट नाशिक'चे मुख्य संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक भावेश ब्राह्मणकर यांचे 'अरुणोदय' पुस्तक प्रकाशन पूर्व बुकिंगसाठी उपलब्ध झाले आहे.
प्रथितयश दिलीपराज प्रकाशनाने २५ टक्के घसघशीत सूट त्यासाठी दिली आहे. 
पुस्तक बुकिंगसाठी खालील लिंकवर क्लिक करावे

https://www.diliprajprakashan.in/products/arunoday-by-bhavesh-brahmankar

Advertisement

Comments

No comments yet.