मुंबई, (प्रतिनिधी) ११ फेब्रुवारी - भारतीय क्रिकेटचा 'देव' मानला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या घरी सध्या लग्नाची लगबग सुरू आहे. सचिनचा मुलगा आणि अष्टपैलू क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अर्जुनचा विवाह सानिया चांदोक हिच्याशी निश्चित झाला असून, या शाही विवाहसोहळ्यासाठी सचिन तेंडुलकरने स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले आहे.
कोण आहे सानिया चांदोक?
अर्जुनची होणारी पत्नी सानिया चांदोक ही प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात आहे. ती एक प्रशिक्षित पशुवैद्यकीय तंत्रज्ञ (Veterinary Technician) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पार पडला होता. आता हे दोघेही आपल्या आयुष्याची नवीन इनिंग सुरू करण्यास सज्ज झाले आहेत.
विवाह सोहळ्याचे नियोजन
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वीचे विधी ३ मार्चपासून सुरू होतील. तर मुख्य विवाह सोहळा ५ मार्च रोजी मुंबईत पार पडणार आहे. या सोहळ्याला क्रीडा, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
अर्जुनची क्रिकेट कारकिर्द
अर्जुन तेंडुलकर हा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले असून, आगामी हंगामासाठी तो लखनऊ सुपर जायंट्स (LSG) संघाकडून खेळताना दिसेल. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सध्या गोवा संघाकडून खेळत आहे.
सचिन तेंडुलकरने नवी दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, क्रीडाप्रेमींकडून अर्जुन आणि सानियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे