'सुवर्ण संचय'च्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा... नाशिकमधील या ज्वेलर्सवर गुन्हा...

Share:
Main Image
Last updated: 11-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) ११ फेब्रुवारी - सराफ दुकानासह सोशल मीडियाच्या माध्यमातून आकर्षक योजनांची जाहिरात करून, नागरिकांना गुंतवणुकीच्या जाळ्यात ओढणाऱ्या 'सुवर्णतीर्थ ज्वेलर्स'च्या संचालकाचे पितळ अखेर उघड झाले आहे. 'सुवर्ण इंद्रधनू' नावाने योजना राबवून गुंतवणूकदारांची मूळ रक्कम आणि परतावा देण्यास नकार देणाऱ्या अजय सुभाष लोखंडे आणि मॅनेजर पूजा वाघ यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाढदिवसाच्या सोने खरेदीतच घातला गंडा
याप्रकरणी रोहिणी तुषार घुगे (रा. सायखेडा, जि. नाशिक) या महिला डॉक्टरने फिर्याद दिली आहे. २ जून २०२४ रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त सोने खरेदीसाठी घुगे दाम्पत्य कॅनडा कॉर्नर येथील 'सुवर्णतीर्थ ज्वेलर्स'मध्ये गेले होते. त्यावेळी दुकानाची मॅनेजर पूजा वाघ हिने त्यांना 'सुवर्ण संचय' योजनेची भुरळ घातली. "दरमहा १८,६३६ रुपयांचे १२ हप्ते भरल्यास, १३ वा हप्ता दुकान भरेल आणि त्यानंतर पूर्ण रक्कम किंवा त्या मूल्याचे दागिने मिळतील," असे आमिष दाखवण्यात आले होते.

दुकान बंद करून हात झटकले
घुगे यांनी विश्वासाने १२ हप्ते पूर्ण भरले. मात्र, १ जानेवारी २०२५ रोजी शेवटचा हप्ता भरल्यानंतर दुकान मालक अजय लोखंडे याने धक्कादायक पवित्रा घेतला. "आम्ही दुकान बंद करत आहोत आणि आमची अशी कोणतीही योजना नाही," असे सांगून त्यांनी घुगे यांची बोळवण केली. उलट, ही गुंतवणूक 'सुवर्ण इंद्रधनू फ्रेटरनिटी फंड'मध्ये असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल केली.

दिलेले धनादेश झाले 'बाउन्स'
फिर्यादींनी मॅनेजर पूजा वाघ हिच्या सांगण्यावरून पुन्हा १३ वा हप्ता भरला, जेणेकरून पैसे परत मिळतील. या बदल्यात लोखंडे याने घुगे यांना ८४,५६३ रुपयांचे तीन धनादेश (चेक) दिले. मात्र, हे तिन्ही धनादेश बँकेत वटले नाहीत (बाउन्स झाले). पैसे परत मिळण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने आपली फसवणूक झाल्याचे घुगे यांच्या लक्षात आले. या योजनेद्वारे संशयितांनी अनेक नागरिकांकडून कोट्यवधी रुपये संकलित केल्याची चर्चा असून, आता तक्रारीसाठी नागरिक पुढे येत आहेत.

पोलीस तपास सुरू
याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर डगळे अधिक तपास करत आहेत. अशा प्रकारे गुंतवणुकीच्या नावाखाली कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.