सोशल मीडियाला भुलला... १० लाखांना चुना...

Share:
Main Image
Last updated: 10-Feb-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १० फेब्रुवारी - फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास लाखोंचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून नाशिकमधील एका व्यावसायिकाला तब्बल १० लाख ३८ हजार ४८० रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सोशल मीडियावरून जाळ्यात ओढले
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित पीडित व्यावसायिक गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून सायबर भामट्यांच्या संपर्कात आले होते. संशयितांनी त्यांना फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये (परकीय चलन खरेदी-विक्री) गुंतवणूक केल्यास कमी वेळात मोठी कमाई करता येते, असे खोटे आमिष दाखवले. सुरुवातीला गोड बोलून आणि नफ्याचे खोटे दावे करून भामट्यांनी व्यावसायिकाचा विश्वास संपादन केला.

वर्षभर परतावा न मिळाल्याने फसवणूक उघड
व्यावसायिकाने विश्वास ठेवून संशयितांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण १० लाख ३८ हजार ४८० रुपये भरले. मात्र, वर्ष उलटूनही त्यांना ना मूळ रक्कम मिळाली ना नफा. परताव्यासाठी व्यावसायिकाने वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, भामट्यांनी दाद दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलिसांत धाव घेतली.

सायबर पोलिसांचे आवाहन
याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावरील कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या गुंतवणूक विषयक सल्ल्याला बळी पडू नये, तसेच 'जादा नफा' देणाऱ्या योजनांची खातरजमा केल्याशिवाय पैसे गुंतवू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

महत्त्वाची टीप: जर तुमची किंवा ओळखीच्या कोणाची अशी फसवणूक झाली असेल, तर तात्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवा.

नाशिक : वॉशिंग करीत असतांना चोरट्यांनी कारच्या डॅश बोर्ड मध्ये ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. हा प्रकार त्र्यंबकरोड भागात घडला. या घटनेत ८० हजार रूपये किमतीच्या दोन अंगठ्या भामट्यांनी लांबविल्या असून याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत शिवाजी चव्हाणके (रा.आनंदवली) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. चव्हाणके गेल्या गुरूवारी (दि.५) सकाळच्या सुमारास कार वॉश करण्यासाठी त्र्यंबकरोड भागात गेले होते. कुमारा हॉटेल समोरील अभंग कार वॉशिंग सेटर येथे त्यांनी कार वॉश करण्यासाठी लावली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारमधील डॅश बोर्डच्या कप्यात ठेवलेल्या सुमारे ८० हजार रूपये किमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या चोरून नेल्या. हवालदार घारे तपास करीत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.